टीम मंगळवेढा टाईम्स ।
भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरी करणारे वाहन पकडून पोलिसांनी कारवाई केल्यानंतर नैराश्यातून एका तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सरकोली येथे घडली.
सोमनाथ विठ्ठल भालेराव (वय.३०, रा.सरकोली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये मोठया प्रमाणात वाळू चोरी होत असून , गेल्या काही दिवसांपासून महसूल आणि पोलिस प्रशासनाने वाळू चोरांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
या अंतर्गत शुक्रवारी सकाळी सरकोली येथून चोरून वाळू घेऊन निघालेले एक पिकअप वाहन तालुका पोलिसांच्या पथकाने पकडून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले.
सोमनाथ भालेराव हा या वाहनातून वाळू चोरी करीत असल्याचे समोर आले. या घटनेनंतर काही वेळाने सोमनाथ याने नैराश्यातून खटकाळवस्ती-सरकोली येथील आपल्या द्राक्ष बागेत जाऊन ‘टू फोर डी ‘ नावाचे विषारी औषध प्राशन केले.
हा प्रकार समजताच नातेवाईकांनी तात्काळ त्याला पुळूजवाडी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले त्यानंतर त्याला पंढरपुरातील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र , प्रकृती गंभीर बनल्यामुळे तेथून अकलूजला हलविण्यात आले.
त्या ठिकाणी उपचारापूर्वीच सोमनाथ याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मयत सोमनाथ याचा मृतदेह थेट येथील तालुका पोलीस ठाण्यात आणला.
पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सर्वांची समजूत काढली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वजण शांत झाले.
मयताचा भाऊ आबासाहेब भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुका पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने वाळू तस्करांविरुद्ध कारवाई केली जात आहे. या अंतर्गत सरकोली येथे एका पिकअपवर कारवाई करण्यात आली . त्यानंतर या वाहनाशी संबंधित सोमनाथ भालेराव याने विषारी औषध प्राशन केले. त्यात त्याचा मृत्यू पाला.
नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात मृतदेह आणून पोलिसांवर आरोप केले असून , या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल . तसेच यापुढेही वाळू चोरांवर कारवाई सुरूच राहील. तालुका पोलीस निरीक्षक . किरण अवचर,
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज