तमिळनाडू व अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये बुधवारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने तसे संकेत दिले आहेत.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे तमिळनाडू व आसपासच्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव काही जिल्ह्यात दिसून येणार आहे.
बुधवार किंवा त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो. पावसाळी वातावरण दोन-तीन दिवस राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
अपेक्षेप्रमाणे थंडीचा कडाका वाढू लागला होता. काही दिवसांपूर्वी तापमानात मोठी घट होऊन पारा १२.८ अंशांवर आला होता. हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश पहाडी भागांमध्ये बर्फवृष्टीमुळे ही स्थिती निर्माण झाली होती.
मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे.
अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. यामुळे जोरदार पावसाची शक्यता नसली, तरी काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची दाट शक्यता वर्तविण्यात आली होती.
आता उत्तर भारतातील पहाडी भागांत पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाल्याने विदर्भात लवकरच थंडीचीही लाट अपेक्षित आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून विदर्भात थंडी कमी जाणवत आहे.
त्यामुळे तापमानातही ११.२ वरून १८ अंशांपर्यंत वाढ झाली. शिवाय कमाल तापमानही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
थंडी वाढत चालल्याने हळूहळू स्वेटर्स, मफलर्स व कानटोपरे बाहेर पडू लागले होते. स्वेटर विक्रेत्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी झाली होती. हवामान विभागाने यंदाही विदर्भात कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज