टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोल्हापूरनंतर आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या 4 जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असल्याचं सांगतानाच 4 जुलै रोजी सोलापूरच्या प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करण्यात येणार आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या 4 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली.
कोल्हापूरनंतर आता सोलापुरात हा मोर्चा निघणार आहे. केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल.
लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं पाटील यांनी सांगितलं. तसेच या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांना भेटून पत्रं देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सोलापूर जिल्ह्याचा दौरा
या मोर्चाची मोर्चेबांधणी करण्यासाठी या आठवड्यात जिल्ह्याचा दौरा सुरु करण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. मूक मोर्चा काढून काहीही होत नाही. त्यामुळे उग्र मोर्चा काढणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको, महामार्ग रोखू
मोर्चासाठी पोलिसांची परवानगी असो नसो, आमचा मोर्चा निघणारच. आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रास्तारोको करणार आहोत. महामार्ग अडवणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. आक्रमक झालो तरच महाविकास आघाडी सरकार दखल घेईल. अन्यथा दाखल घेतली जाणार नाही.
मराठा समाज लढवय्या समाज असल्याने आता आक्रमक होण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल त्यांचं त्यांनी स्वागत केलं. पण ही वैयक्तिक याचिका आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र सरकार अजूनही झोपलेले आहे, अशी टीका त्यांनी केली.
मराठ्यांचा विषय आला की कोरोनाचं कारण दाखवलं जातं. मात्र मागील वर्षी काँग्रेसने ट्रॅक्टर रॅली काढली. ते कसं चाललं? आता आमच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे आम्ही आंदोलन करणार आहोत, असं सांगतानाच क्रांती मोर्चाचे लोक कुठे आहेत? ते जातिवंत मराठा आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.
सोलापूर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर येत्या 25 जून रोजी नवी मुंबई येथे माथाडी समाजाची गोलमेज परिषद होणार आहे. या परिषदेला खा. संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या परिषदेला भाजप नेते नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मोर्चासाठीची अशी असेल तयारी
28 जून रोजी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेणार, 29 जुलै रोजी माळशिरस, माढा, कुर्डुवाडीला भेट देऊन जनजागृती करणार, 30 जून रोजी बार्शी, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण दौरा आणि सभा, 1 जुलै रोजी अक्कलकोट दौरा, 2 जुलै रोजी बाईक रॅली काढून मोर्चाची तयारी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज