मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं, मैं तो फायर हूॅं अशा शब्दात वय झाले असल्याच्या टिकेवर शरद पवार यांनी आज उत्तर दिले. शरद पवार नाशिकमध्ये असून त्यांची छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात आज सभा आहे.
सभेआधी नाशिकमध्ये पवारांनी पत्रकारपरिषद घेत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांच्यासह अनेकांनी पवार यांचे वय झाले आहे, त्यांनी आता थांबायला हवे अशी टीका केली होती.
यावेळी त्या टिकेला त्यांनी चांगलच प्रत्युत्तर दिले. यावेळी मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्यांपैकी अनेक नेत्यांचे वय 70 पेक्षा अधिक असल्याचे पवार म्हणाले. ना टायर्ड हूॅं ना रिटायर्ड हूॅं अशा शब्दात त्यांनी आपल्या वयावरुन करण्यात आलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
स्वातंत्र्याच्या चळवळीत येवल्याचे योगदान होते, त्यामुळे येवल्यातून या महाराष्ट्र दौ-याला सुरुवात केली असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केले आहे, पुलोद पासून नाशिक जिल्हा पवारांच्या सोबत उभा राहिला आहे. त्यामुळे नव्या इनिंगची सुरवात करण्यासाठी त्यांनी बारामती, म्हाडा नव्हे तर नाशिकला पसंती दिली असून नाशिककरांना साद घातली आहे.
पवारांच्याच मुशीत तयार झालेल्या रोहित पवारांनीही अजित पवार गटात सहभागी झालेल्यावर हल्ला करत पवार गटाचे इरादे स्पष्ट केलेत. ठाकरे गटानेही भुजबळांच्या विरोधात दंड थोपटले असून पवारांच्या सभेला रसद पुरवत पाठबळ दिले आहे.
एकीकडे पवारांचा झंझावात सुरू झाला असताना, दुसरीकडे पवारांच्या दौऱ्याचे महत्व कमी करण्यासाठी आणि नाशिकचे बाहुबली आपणच आहोत. हे दाखवून देण्यासाठी छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधे येण्याचा आजचाच मुहूर्त शोधला.
पवार साहेबांचे आपल्यावर प्रेम असल्याने ते येवल्यात सभा घेत आल्याची खोचक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. छगन भुजबळ राज्यातील वरिष्ठ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. भुजबळ जेव्हा जेव्हा अडचणीत येतात, नवा मार्ग निवडतात किंवा संघर्षाला उतरतात.
तेव्हा तेव्हा ओबीसींची मोठी ताकद त्यांच्या सोबत उभी राहते. आजही नाशिकच्या रस्त्यावर तेच दृश्य होते. त्यामुळे आजची गर्दी आणि दोन्ही गटाचे शक्ती प्रदर्शन मतात परावर्तित होते का? हे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल, तोपर्यंत हल्ले, प्रतिहल्ले, आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच राहणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज