टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणाऱ्यांना आता मातीत गाडायचे अन शेतकऱ्यांच सोनं करणारे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून द्यायचे असे भावनिक आवाहन अमोल कोल्हे यांनी केले आहे.
अब की बार चारसौ पार असतं तर दोन-दोन पक्ष कशाला फोडायला लागले असते? दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात कशाला टाकायला लागले असते.
देशातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे अब की बार हद्दपार अशी सडकून टीका शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी महायुतीवर केली. म्हसवड येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
या वेळी विजयसिंह मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, अभयसिंह जगताप, कविता म्हेत्रे, विलास माने, बाळासाहेब सावंत, महादेव मासाळ, युवराज बनगर, हर्षदा देशमुख-जाधव, पृथ्वीराज राजेमाने, जय राजेमाने, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते.
अमोल कोल्हे म्हणाले, ”माढा मतदारसंघाचे, माण-खटावचे अन् म्हसवडचं ठरलंय, तुतारीपुढचं बटण दाबायचं. अपेक्षाभंग करणारं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही लढाई होत आहे.
हे शेतकऱ्यांच्या तोंडावर दिवसाला सतरा रुपये फेकून किसान सन्मान योजना म्हणतात अन् त्याबदल्यात शेतकऱ्यांचा स्वाभिमान हिरावून घेतला जातोय. धर्माची गोळी देऊन जी दिशाभूल चालू आहे, आजही मनुवादी प्रवृत्ती तुमचे आत्मभान जागृत करण्यापासून रोखतेय. शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणाऱ्यांना मातीत गाडायचे असे आवाहन देखील कोल्हे यांनी केले.
उत्तमराव जानकर म्हणाले, ”धनगर समाजाची काठी ही स्वाभिमानाची काठी आहे. या काठीने त्यांची पाट फोडून काढली पाहिजे. २०१४ रोजी धनगर समाजाला आरक्षण देणार होते; पण आजपर्यंत काहीही दिले नाही. परवा पंतप्रधानांनी माळशिरस तालुक्याला काय दिले, हे सांगणं अपेक्षित होतं.
ते मात्र, शिव्याशाप देत बसले. आत्मसन्मान दुखावला, फसवणुकीचा कहर झाला, हे कुठंतरी संपले पाहिजे. या उद्देशाने बंड केले. महायुतीचा शेवट झालेला आहे. गेल्यावेळी आम्ही केलेली चूक यावेळी दुरुस्त करतोय.”
प्रभाकर देशमुख म्हणाले, ”ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. तुतारी वाजणार असून, धैर्यशील मोहिते-पाटील विजयी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे आणि अशक्यप्राय असे निर्णय शरद पवार यांनी घेतले.
बंगळूर-मुंबई कॅरिडॉरअंतर्गत म्हसवड येथे औद्योगिक वसाहत शरद पवार यांच्यामुळेच होत आहे.” या वेळी अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, अभयसिंह जगताप यांचीही भाषणे झाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज