मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
लोकनियुक्त सरपंच व कुंभी कारखाना संचालक उत्तम वरुटे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ३२८ मताधिक्क्याने मंजूर झाला. काल झालेल्या ग्रामसभेत चुरशीने मतदान होऊन ठरावाच्या बाजूने १०४१, तर ठरावाच्या विरोधात ७१३ मते पडली.
५५ मते बाद झाली. यामुळे येथील सरपंचपद रिक्त झाले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी काम पाहिले.
काल सकाळी ८ ते ११ या वेळेत ग्रामसभेला सुरुवात झाली. यावेळी १८३४ मतदार उपस्थित होते. एवढ्याच मतदारांना ११ ते ४ या वेळेत मतदानाचा अधिकार मिळाला. मतमोजणी मतदान केंद्रावरच झाली. या प्रक्रियेत पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
कसबा बीड येथील ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये झाली आहे. या निवडणुकीत करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी व गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने दहा जागा जिंकल्या होत्या.
पण, सरपंच पद गमावले होते, तर कुंभीचे संचालक उत्तम वरूटे, पांडुरंग विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष अमित वरुटे, कुंभीचे माजी संचालक शैलेश वरुटे, पंडित वरुटे यांच्या आघाडीचा एक सदस्य व सरपंच पदाचे उमेदवार उत्तम वरुटे निवडून आले होते.
गेल्या अडीच वर्षांपासून सरपंच व सदस्यांमध्ये कामामध्ये समन्वय नव्हता. त्यामुळे सर्व अकरा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे फौजफाट्यासह दिवसभर तळ ठोकून होते. तसेच तालुका पंचायत अधिकारी डॉ. संदेश भोईटे व कर्मचारी उपस्थित होते.
निकराची झुंज
सरपंच उत्तम वरुटे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी विरोधातील तसेच त्यांच्या गटातील प्रमुख नेते मंडळी त्यांच्या विरोधात गेली होती, तरीही सरपंच उत्तम वरुटे यांनी निकराची झुंज दिली. त्यांना पडलेली लक्षणीय मते गावातील नेते मंडळींना विचार करायला लावणारी आहेत.
लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव आणण्याची परिसरातील ही चौथी घटना आहे. सावरवाडी येथे जिल्ह्यातील पहिला अविश्वास ठराव दाखल झाला होता. यामध्ये विद्यमान सरपंचांच्या बाजूने मतदान झाले होते. हिरवडे दुमालामध्ये ही याची पुनरावृत्ती झाली होती, तर बहिरेश्वर व कसबा बीडमध्ये मात्र अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान झाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज