टीम मंगळवेढा टाईम्स।
अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या आरोपाखाली गजाआड गेलेल्या सलगर बुद्रुक मधील आरोपी हा बोगस डॉक्टर आहे हे उघड झाले आहे.
मंगळवेढा तालुक्यात राजकीय,शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक दृष्ट्या नावाजलेले गाव म्हणून ओळख असलेल्या सलगर बुद्रुक गावांमध्ये बोगस डॉक्टरने गावाची मान शरमेने खाली जाईल अशा प्रकारचे कृत्य केले आहे.
याला मंगळवेढा तालुका आरोग्य खाते व पंचायत समिती प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे असे नागरिकांचे मत आहे.
जवळपास गेल्या पंधरा ते आठरा वर्षांपासून सलगर बुद्रुक या गावांमध्ये आपण डॉक्टर असल्याचे भासवून तो वैद्यकीय सेवेच्या नावाखाली नागरीकांच्या जीवाशी खेळत होता. हे गावातील लोकांना माहीत नव्हते काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
शिवाय तालुका आरोग्य खात्या काढून देखील कोणत्याच प्रकारची कारवाही आजतागायत या बोगस डॉक्टर विरुद्ध झाली नाही.
तसेच वेगवेगळ्या काळात सेवेत असलेल्या गट विकास अधिकाऱ्यांनीही कसलीच कारवाही या डॉक्टर विरोधात केली नाही. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य खात्याचा निष्काळजीपणा या घटनेमुळे उघड झाला आहे.
दरम्यान ‘सलगर बुद्रुक येथे प्रथम श्रेणीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात वेगवेगळ्या कामानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांचे येणे जाणे असायचे.
तरीही या बोगस डॉक्टरचा सुगावा कसा लागला नाही याची शंका सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्पन्न होत आहे हा डॉक्टर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सलगर बुद्रुक मधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हाताखाली कंपाउंडर चे काम करत होता.
नंतरच्या काळात बोगस कागदपत्रे गोळा करून आपण डॉक्टर आहे. असे सांगून सलगर बुद्रुक गावांमध्ये स्वतःचे खाजगी रुग्णालय थाटून जनतेच्या जीवाशी खेळ करत होता.
दरम्यान गावातील ग्रामस्थांना या बोगस डॉक्टरच्या वाईट वागणुकीची कल्पना होती. या आगोदर या आरोपीने गावातील बऱ्याच अल्पवयीन मुलांसोबत अशी घाणेरडी कृत्ये केली होती.
ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर या आरोपिला चोप देऊन समज देण्यात आली होती.
दरम्यान, यासारखे आणखी बोगस डॉक्टर मंगळवेढा तालुक्यात ठिकठिकाणी जनतेच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तरी तालुका आरोग्य खात्याने या घटनेतून शहाणपण घेऊन बोगस डॉक्टरच्या विरोधात मोहीम उघडून कारवाही करायला हवी, अशी मागणी जनतेतून येऊ लागली आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज