टीम मंगळवेढा टाईम्स।
अनैतिक संबंधाच्या आड येणार्या शिक्षक पती सत्यवान कांबळे (रा.रड्डे) याचा शिक्षक पत्नी इंदिरा व तीचा प्रियकर प्रशांत या दोघांनी इतरांना एक लाखाची सुपारी देवून रस्सीने गळा आवळून त्या रात्री खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील मयत शिक्षक सत्यवान कांबळे हा मुळचा रड्डे येथील असून तो उमदी येथील डॅफोडील प्रशालेत नोकरीस होता. कांबळे यांचे लग्न शिवणगी येथील इंदिरा हिजबरोबर 2016 मध्ये झाले होते.
मयत सत्यवान यास दोन लहान मुले आहेत. तो रड्डे येथे मूळ गावी न राहता त्याची सासुरवाडी शिवणगीत रहात होता.मयत शिक्षक सत्यवानची आई सांगलीला रहावयास गेली होती. त्यावेळी शिक्षक पत्नी इंदिरा ही पण तिकडे रहावयास असल्याने इंदिरा व प्रियकर प्रशांत यांचे ओळखीतून प्रेमात रुपांतर झाले.
मागील पाच वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट्ट झाल्याने ते एकमेकास सोडावयास तयार नव्हते. ते नेहमी मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात सातत्याने रहात असल्याने प्रेम बहरत गेले.
इंदिरा ही कालांतराने सोड्डीला आल्यानंतर तीचा प्रियकर प्रशांतही सोेड्डीला अधून मधून येत असे.त्यामुळे नवरा पसंत नाही असा सूर इंदिराच्या तोंडून निघू लागला. व या प्रेमात शिक्षक पती हा दोघांनाही अडथळा वाटू लागल्याने त्याचा काटा काढण्याचा या दोघांनीही कट रचला.
त्यांनी आरोपी अजय घाडगे,शाहरूख शेख, गणेश माेरे यांना शिक्षक सत्यवान कांबळे याच्या खूनासाठी एक लाखाची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात उघड होवून खून केल्याची आरोपीनी कबुली दिली.
दि.8 रोजी वरील सर्व आरोपी शिवणगी येथे रात्री एकत्र आले.त्यांनी मध्यरात्रीच्या दरम्यान सत्यवान याचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करून त्याचे प्रेत पंख्याला लटकावून आत्महत्या केल्याचा बनाव केला.
घटनेनंतर वरील आरोपी पहाटेच्या दरम्यान उमदी हद्दीतून जात असताना तेथील गस्त घालणार्या पोलिसांनी त्यांना आडवून अधिक चौकशी केली असता नातेवाईक मयत झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी गेल्याचे कारण पुढे करून निसटले.
या दरम्यान पोलिसांनी चलाखी करत ओळख म्हणून त्यांचे आधारकार्डाचे फोटो घेतले होते. याच वेळी उमदी परिसरात खुनाची घटना घडल्याने पोलिस त्या मारेकर्यांचा शोध घेत होते.
या बाबतीत सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने यांना संशयावरून चौकशीस बोलावून पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखे मिठू मिठू बोलत शिवणगी येथील सत्यवान कांबळे याच्या खूनाची कबुली दिली.
ही घटना मंगळवेढा तालुक्यातील असल्याने सांगलीच्या स्थानिक पोलिसांनी या आरोपींना मंगळवेढयाच्या डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांचेकडे वर्ग केले.
हा तपास सोलापूर जिल्हयाच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,सहाय्यक फौजदार अशोक बाबर,पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले,पोलिस नाईक सुनिल मोरे,शिवाजी पवार,
पोलिस शिपाई मळसिध्द कोळी आदी टिमने यशस्वीरित्या या खूनाचा उलगडा करून आरोपीला जेरबंद केले. प्रथमतः न्यायालयाने सात दिवसाची व नंतर चार दिवसाची वाढीव अशी एकूण 11 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. याची मुदत संपल्याने सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज