दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकानदार, फळविक्रेते, हातगाडी चालक अशा ११ हजार जणांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यातून ३०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
या आठवड्यात रिक्षाचालक, बेकरीवाले, हॉटेल आणि केशकर्तनालयातील कर्मचाऱ्यांना अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक राहील. याबाबतचा आदेश सोमवारी जारी करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याबद्दल मनपा उपायुक्त धनराज पांडे म्हणाले, दुसऱ्या लॉकडाऊनची आवश्यकता भासू नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. लॉकडाऊन झाल्यास पुन्हा मोठे नुकसान होणार आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी राहील. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता दुकानदार, हातगाडीवाल्यांसह मिठाईवाले, रिक्षाचालक, हॉटेलचे कर्मचारी, केशनकर्तनालयातील कर्मचाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.
टेस्टचा अहवाल आपल्यासोबत बाळगणे आवश्यक आहे. महापालिकेने नव्याने २० हजार टेस्ट किट मागविले आहेत. पुढील आठवड्यात महापालिकेचे पथक या सर्व आस्थापनांची चौकशी करणार आहे.
टेस्ट न करताच दुकान अथवा हॉटेल सुरू ठेवल्यास ५०० रुपये दंड आणि प्रसंगी परवाना रद्दची कारवाई होईल.
फटाके वाजविण्यास ‘या’ ठिकाणी मनाई
दिवाळीच्या काळात शहरात सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजविण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. फटाक्यांमुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण आणखी कमी होते.
कोरोना हा श्वसनाशी निगडित आजार आहे. फटाक्यांमुळे श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांना त्रास होऊ शकतो.
यंदाची दिवाळी सामाजिक उपक्रमांनी साजरी व्हावी, यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी कारवाईची वेळ आणू नये, असेही पांडे यांनी सांगितले.
आता थेट परवाना रद्द
मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि अँटिजेन टेस्ट न करताच दुकाने चालविणे आदी कारणास्तव महापालिकेने गेल्या चार महिन्यांत ३५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम आणखी कडक होईल. यापुढील काळात परवाने रद्दची कारवाई होईल, असा इशाराही प्रशासनामार्फत देण्यात आला.(Source :लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज