टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडून मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण केले आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. तब्बल ४०च्या आसपास आमदारांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केली आहे.
यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सायंकाळच्या सुमारास फेसबुक लाईव्ह द्वारे शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला.
मला कुठल्याही पदाचा मोह नाही. मुख्यमंत्री पद त्यागण्यास मी तयार आहे, शिवसेना पक्ष प्रमुख पदही सोडण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात नाराज आमदारांनी प्रत्यक्ष संवाद साधण्याची विनंती त्यांनी केली.
तसेच, थोड्याच वेळात मी वर्षा हे निवासस्थान सोडून मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार, उद्धव यांनी सर्व सामानासह वर्षा बंगल्याला निरोप दिला आणि कलानगरमधील मातोश्री निवासस्थान गाठले आहे.
यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक वर्षा बंगल्याबाहेर उपस्थित होते. उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मुख्यमंत्री बाहेर पडताच पुष्पवर्षाव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडून बाहेर आले, तेव्हा बाहेर उभे असलेल्या शिवसैनिकांकडून त्यांच्या पुष्पवृष्टी करण्यात आली.
व्हिडीओ बघा:-
लाखो शिवसैनिकांसाही हा क्षण हा भावनिक होता. यावेळी मुख्यमंत्री यांनी हात जोडत लोकांचे आभार मानले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही सुरू होती.
शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याने मुख्यमंत्र्यांची गाडी या गर्दीतून वाट काढत हळू हळू पुढे सरकार होती. यावेळी पोलीस शिवसैनिकाना हटवण्याचे काम करत होते. मात्र शिवसैनिकही तरीही मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पुष्पवर्षाव हे करतच होते.
संपूर्ण परिवारही होता सोबत
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा संपूर्ण परिवार होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, तसेच धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हेही त्यांच्यासोबतच वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. नेहमी सुसाट निघणाऱ्या या गाड्या शिवसैनिकांच्या गर्दीमुळे यावेळी धीम्या गतीनं मातोश्रीकडे जात होत्या.
वर्षा बंगल्यावरील साहित्यही शिफ्ट केलं
मुख्यमंत्री त्यांचं साहित्य बाहेर काढतानाचे काही फोटोही समोर आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली होती. आम्ही काहीही झालं तरी मुख्यमंत्र्यांबोत आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांनी दिली आहे.
भाजप नेत्यांकडून टीकेची झोड
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत हल्लाबोल चढवला आहे. बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? विधिमंडळात शिवसैनिक नाही आमदार मतदान करतात. पुरे झालं, जनता विटली आहे, खिशातला राजीनामा बाहेर काढा आता…, असे ट्विट आता त्यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज