टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार शुक्रवारी 18 डिसेंबर रोजी पंढरपूर तालुका दौऱ्यावर येत असल्याची खात्रीलायक बातमी असून ते सरकोली येथे जावून कै.आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
कै.भारत भालके हे पुण्यातील रूग्णालयात उपचारासाठी दाखल असताना शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जावून डॉक्टरांकडून त्यांच्या तब्बेतीविषयी माहिती घेतली होती. त्यांचे सतत भालके यांच्या उपचाराकडे लक्ष होते.
मात्र 28 नोव्हेंबर रोजी आमदार भारत भालके यांचे निधन झाले. पवार आणि भालके कुटुंबाचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कै.भारत भालके यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकोली येथे आले होते.
आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी 18 डिसेंबर रोजी येत आहेत.कै.भारत भालके यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
याच बरोबर विठ्ठल परिवारावर ही मोठा आघात आहे. याच परिवाराने काही महिन्यांपूर्वी राजूबापू पाटील यांना गमावले आहे तर आता आमदार भालके यांचे निधन झाले आहे.
दरम्यान विठ्ठल कारखाना परिवार तसेच पंढरपूर विभागाशी शरद पवार यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. यामुळे आता 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीसह आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांचे मार्गदर्शन विठ्ठल परिवाराला राहणार हे निश्चित आहे.
आता ही पवार यांचा होत असलेला दौरा कारखाना अध्यक्षपद निवडीच्या तोंडावरच होत आहे. खासदार शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पंढरपूर तालुक्याचा दौरा करून कै.सुधाकरपंत परिचारक, कै.राजूबापू पाटील तसेच कै.रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज