मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात भाविकांच्या दर्शन रांगेसाठी टाकण्यात येणाऱ्या मंडप व दर्शन रांगेचे टेंडर मिळवून देतो म्हणून मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री व त्यांचा मध्यस्थ नितीन धोत्रे यांनी ४ लाख ७० हजार रुपयांची रक्कम घेतल्याचा गंभीर आरोपी एका मंडप व्यावसायिकाने केला आहे.
यासंबंधी त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. या तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा निर्वाळा कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिला.
तक्रारदार पुरुषोत्तम नागनाथ सग्गम (वय ५०, रा. ३६९, सोनिया नगर, विडी घरकुल, हैदराबाद रोड, सोलापूर) यांचा मंडप कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. त्यांचा मित्र विशाल अंबादास सरवदे (रा. सोलापूर) याने सांगितले की, पंढरपूरमध्ये नितीन जगन्नाथ धोत्रे या नावाचा मित्र असून त्याने पंढरपूर येथे वारीचे मंडप कॉन्ट्रक्टचे टेंडर निघणार असून तुमचा कोणी मित्र असेल तर सांगा, असे सांगितले.
मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री हे माझे चांगल्या ओळखीचे असून त्यांनीच मला टेंडर घेण्यासाठी माणूस बघ म्हणून सांगितले आहे. तुला टेंडर भरायचे असेल तर सांग, असा निरोप दिला. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०२५ रोजी भेटण्यास बोलावले.
ठरलेल्या दिवशी मंदिर समितीच्या भक्तनिवासातील मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यावेळी तुम्ही टेंडर भरा तुम्हाला पत्राशेड, दर्शनबारी व मंडपाचे काम मिळवून देतो, परंतु मला टेंडर रकमेच्या ७ टक्के रक्कम कमिशन स्वरूपात रोखीने अॅडव्हान्स म्हणून द्यावी लागेल असे सांगितले, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.
२४ फेब्रुवारी २०२५ रोजी मंडपाचे कामाचे टेंडर भरले, त्यानंतर धोत्रे यास फोन करून सांगितले. त्याने ठरल्याप्रमाणे अॅडव्हान्स रक्कम श्रोत्री साहेबांना देण्यासाठी घेऊन या असे सांगितले. २५ फेब्रुवारी दीड लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन श्रोत्रींच्या ऑफिसमध्ये गेले होते.
तेव्हा श्रोत्री यांनी पैसे आणले असतील तर धोत्रे यांच्याकडे देण्यासाठी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी धोत्रे हे सोलापूर येथे आले. त्याने श्रोत्री साहेबांच्या नावे पुन्हा २० हजार रुपये घेतले.
मात्र, काही कारणाने टेंडर रद्द झाल्यावर श्रोत्रींनी पुन्हा नवीन टेंडर भरण्यास सांगितले. २४ मार्च रोजी पुन्हा नव्याने टेंडर भरले. दोन-तीन दिवसांनी पुन्हा त्यांच्या मागणीनुसार ३ लाख रुपये घेऊन भक्तनिवास येथे गेलो. त्यावेळी धोत्रे यांनी श्रोत्री यांना फोन करून पुरुषोत्तम सग्गम हे पैसे घेऊन आल्याचे सांगितले. त्यावेळी ३ लाख रुपये दिले.
परंतु काही दिवसांनी टेंडर दुसऱ्याला गेल्याचे कळाले, त्यामुळे सग्गम यांनी दिलेले पैसे परत मागितले. वेळोवेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री व नितीन धोत्रे यांना फोन करून तुम्ही आमचे काम केले नाही आमचे पैसे तर परत द्या अशी विनंती केली.
परंतु, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे रोख रक्कम ४ लाख ७० हजार रुपये व ७५ हजार रुपये टेंडर भरण्याचे चार्जेस असू एकूण ५ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा अर्ज घेऊन सग्गम पोलिस ठाण्यात गेले होते.(स्रोत:लोकमत)
समितीच्या व्यवस्थापकांशी चर्चा केलेले संभाषण व्हायरल
पुरुषोत्तम सग्गम यांनी टेंडर मिळावे यासाठी दिलेली ४ लाख ७० हजार रुपये परत मिळावे यासाठी वारंवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री व नितीन धोत्रे यांना फोन केले होते. त्या फोनदरम्यान झालेल्या संभाषणाच्या क्लीप व्हायरल झाल्या आहेत.
कोणीही सहभागी असल्यास कारवाई करू
मंदिर समितीचे टेंडर मिळवून देतो म्हणून पैसे घेतल्याबाबतचा तक्रार अर्ज माझ्यापर्यंत आला नाही. तसा अर्ज आल्यास किंवा पोलिस प्रशासनाने चौकशी केल्यास त्यांना आपण सहकार्य करू, त्याचबरोबर या प्रकरणात कोणीही सहभागी असल्यास कारवाई करू.- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती.
टेंडर देतो म्हणून पैसे घेतले
माझे मंदिर समितीच्या व्यवस्थापकांच्या कार्यालयातच मनोज श्रोत्री यांच्याशी बोलणे झाले, यामुळे नितीन धोत्रे यांच्याकडे रुपये दिले. मला टेंडर देतो म्हणून माझ्याकडून पैसे घेतले होते. परंतु मला पैसेपण परत मिळत नव्हते, यामुळे मी त्यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.- पुरुषोत्तम नागनाथ सगम, कमर्शियल, मंडप
मला काही बोलायचे नाही.
यात्रा कालावधीतील मंडपाच्या टेंडर संदर्भातील संभाषणाच्या ऑडिओ क्लीप माझ्यापर्यंत आल्या नाहीत, त्यामुळे याच्यावर मला काही बोलायचे नाही.- मनोज श्रोत्री, व्यवस्थापक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
तक्रार आल्यानंतर चौकशी करणार
माझ्याकडे अद्याप कसलीही तक्रार आली नाही. तक्रार आल्यानंतर चौकशी करण्यात येईल.- विश्वजीत घोडके, पोलिस निरीक्षक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज