टीम मंगळवेढा टाईम्स।
‘तू आमच्या मुलीला कायमस्वरूपी माहेरी का पाठवत नाहीस, या कारणावरून चिडलेल्या सुनेच्या माहेरकडील नातेवाईकांनी मिळून शिवीगाळ करत मुलीच्या सासूसह चौघींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास जुजारपूर (गोडसे मळा, ता. सांगोला) येथे घडली.
याबाबत विमल अमृत हिप्परकर यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सून प्रियांकाच्या माहेरकडील ९ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जुजारपूर ( गोडसे मळा) येथील विमल हिप्परकर यांच्या मुलगा हेमाजी याचा ६ महिन्यांपूर्वी (बेनुर, ता. कवठेमहांकाळ) येथील प्रियांका हिच्याशी विवाह झाला होता.
लग्नानंतर चार महिन्यांनी सून प्रियांका हिचे नातेवाईक मुलीच्या घरी येऊन आमच्या मुलीला माहेरी का पाठवत नाही, या कारणावरून वारंवार विचारणा करत धमकी देत होते.
दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास विमल हिप्परकर त्यांची आई चंद्राबाई, सून पूजा, मुलगी जयश्री असे घरात जेवण करत होते.
त्यावेळी धाकटी सून प्रियांकाच्या माहेरचे जनाबाई करांडे, आवडाबाई करांडे, शोभा काळेल, दिया काळेल, अजय काळेल, दिलीप काळेल, सतीश काळेल, अक्षय करांडे, वसंत करांडे असे मिळून सर्वजण (एमएच ०४, इवाय ६६०७) या चारचाकी वाहनातून त्यांच्या घरासमोर आले.
त्यावेळी घरासमोर वाहन कोणाचे आले म्हणून बघण्यासाठी विमल हिप्परकर घराबाहेर गेल्या असता, त्यांना धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी विमलची आई चंद्राबाई, सून पूजा, मुलगी जयश्री बाहेर आल्या असता, प्रियांका हिच्या माहेरच्या लोकांनी त्यांना हातांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज