टीम मंगळवेढा टाईम्स ।
दिवाळीच्या सण-उत्सवात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून दोन-अडीचपट भाडेवाढ केली जाते. मात्र, एसटी बसच्या तिकीट दरापेक्षा दीडपट भाडेवाढीचा अधिकार असतानाही खासगी वाहनचालक विशेषत: ट्रॅव्हल्स चालकांकडून त्याचे पालन होत नाही.
या पार्श्वभूमीवर आता प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) गजानन नेरपगार यांनी सहा भरारी पथके नेमली असून, प्रवाशांना जादा तिकीट घेतल्याच्या तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र टोल फ्री क्रमांक व ई-मेल उपलब्ध करून दिला आहे.
प्रवाशांचे बुकिंग करणाऱ्या बुकिंग एजंटांच्या कार्यालयासमोर त्यांनी तिकीट दराचे फलक लावणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडून त्या दरानुसार प्रवाशांना तिकीट दिले जाते का, याची पडताळणी भरारी पथकांकडून होणार आहे.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी देखील त्यांना बसवता येणार नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनाचा किंवा चालकाचा परवाना रद्द होवू शकतो, असा इशारा आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
खासगी वाहनांपेक्षा एसटी बसगाड्यांचे दर अल्प असतात आणि यंदा दिवाळीच्या निमित्ताने विविध मार्गांवरील बसगाड्यांची संख्या देखील दुप्पट केली जाणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. आता खरोखरच खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या मनमानीला चाप बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसटी बस बंद पडल्यास पैसे परत मिळतात
प्रवासादरम्यान वाटेतच एसटी बस बंद पडण्याचे प्रकार होतात. त्यावेळी प्रवाशांना खाली उतरवून दुसरी बस येण्याची वाट पहावी लागते. त्या मार्गावरील दुसरी बस येईपर्यंत प्रवाशांना रस्त्यावरच थांबून राहावे लागते.
पण, कोणत्या प्रवाशाला दुसऱ्या वाहनाने जायचे असल्यास ते संबंधित बसच्या वाहकाकडे तिकिटाचे पैसे परत मागण्याचा अधिकार आहे. पण, जिथपर्यंत प्रवास झाला आहे, तेथून पुढील तिकिटाचे पैसे परत दिले जातात.
प्रवाशांची लूट होणार नाही याची खबरदारी
सण-उत्सव काळात प्रवाशांची गर्दी मोठी असल्याने खासगी प्रवासी वाहनांचे दर वाढविले जातात. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक खासगी बुकिंग केंद्रांवर तिकीट दराचे फलक लावणे बंधनकारक आहे.
कोणी जादा तिकीट आकारणी केल्यासंदर्भात तक्रार केल्यास त्याची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. जादा तिकीट आकारणीवर लक्ष ठेवण्यासाठी सहा भरारी पथके नेमली असून त्यांच्या माध्यमातून प्रवाशांची लूट होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.- गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
प्रवाशांना तक्रारीसाठी ‘हा’ टोल फ्री क्रमांक
टॅक्सी, ऑटोरिक्षा, प्रवासी ट्रॅव्हल्स चालकांविरुद्ध प्रवाशांना भाडे नाकारणे, उद्धट वर्तणूक, जादा भाडे आकारणीसंदर्भातील तक्रारी करता येतील. त्यासाठी सोलापूर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी टोल फ्री क्रमांक (९४२०५६४५१३) उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय dyrto.13.mh@gov.in किंवा mh13@mahatranscom.in या ई-मेलवर देखील प्रवाशांना तक्रार करता येणार आहे.
विभाग नियंत्रकांच्या पत्राकडे ‘आरटीओ’चे दुर्लक्ष
मुख्य बस स्थानक परिसरातील २०० मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने उभी असू नयेत व त्यांचे एजंट देखील तेवढ्या अंतरात नसावेत, असा नियम आहे. पण, याचे पालन होत नसल्याची वस्तुस्थिती सोलापूरच्या मुख्य बसस्थानक परिसरात पाहायला मिळते.
दरम्यान, सोलापूर विभाग नियंत्रकांनी सोलापूर बस स्थानक परिसरात कायमस्वरूपी दोन अंमलदार नेमून ई-चालनद्वारे कारवाई करावी असे पत्र आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार कार्यवाही होत नसल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज