टीम मंगळवेढा टाईम्स ।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केलं होतं.
या प्रकरणावर अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करत कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासोबत 150 महिला आणि पुरुष पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी दिनेश वीर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर रविवारी पोलिसांनी आदेश धुडकावणे (भादंवि 188 ), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 या कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला.
शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाजवळील धनश्री अपार्टमेंट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नूतन मध्यवर्ती कार्यालय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इच्छुकांनीही यावेळी शक्तीप्रदर्शन केले होते. कार्यकर्त्यांनी अस्ताव्यस्त पद्धतीने गाड्या लावल्याने डेंगळे पुलाच्या परिसरात काही काळ वाहतुकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष महेश हांडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधीत कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी अर्ज दिला होता.
अर्ज सादर करताना हांडे यांनी करोना संसर्ग असल्याने प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे कार्यकर्ते पालन करतील. कार्यक्रमास 100 ते 150 जण उपस्थित राहतील, असे अर्जात नमूद केले होते. प्रत्यक्षात मात्र कार्यक्रमस्थळी 400 ते 500 कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काही कार्यकर्त्यांनी तोंडावर मास्कही घातला नव्हता. खुद्द अजित पवार यांनीही या गर्दीवर नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, पोलिसांनी शनिवारी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी रविवारी आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल केले, असे शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलीमा पवार यांनी सांगितले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज