टीम मंगळवेढा टाईम्स ।
हुंडा देणं किंवा घेणं कायद्याने गुन्हा आहे. असं असून देशात हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून त्रास दिल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
दिवसेंदिवस अशा गुन्ह्यात भर पडत चालली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार सोलापूरात घडला आहे.
येथील एका तरुणानं हुंड्यासाठी आपल्या पत्नीचा अमानुष छळ केला आहे. पीडित विवाहित तरुणी गर्भवती असूनही आरोपीनं तिला उपाशीपोटी ठेवलं आहे.
तसेच हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यासह मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पती अभिषेक राजगोपाल दरगड, सासू प्रेमा राजगोपाल दरगड आणि सासरे राजगोपाल हिरालाल दरगड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.
याबाबत मनीषा दरगड यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा यांचा 2017 साली आरोपी पती अभिषेक याच्याशी विवाह झाला होता.
विवाहानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी खूप चांगल्या प्रकारे वागवलं. पण लग्नानंतर एक वर्षाने पतीसह सासू आणि सासऱ्यांनी आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली.
त्यांनी पीडित मनीषा यांना मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच माहेरच्या लोकांकडून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. दबावाला बळी पडून विवाहितेनं आपल्या माहेराहून दोन लाख रुपये आणून सासरच्या मंडळींना दिले.
दोन लाख घेऊनही समाधन न झाल्याने आरोपींनी पुन्हा एक लाख रुपयांची मागणी करत फिर्यादी मनीषा यांना त्रास द्यायला सुरुवात केली.
पीडित महिला गर्भवती असून देखील आरोपींनी तिला उपाशीपोटी ठेवत अमानुष छळ केला आहे. तसेच हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.(स्रोत:News 18 लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज