टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा असर कमी होताना दिसत असला तरी लस प्रत्येकांनी घेणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्यांसाठी पाथुर्डी (ता.करमाळा) ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकून एक आगळा निर्णय घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या संबधित परिवाराला स्वस्त धान्य दिले जाणार नाही, एवढेच नाही तर शासकीय योजनांचा कोणताही लाभ दिला जाणार नाही असा ठरावच पाथुर्डी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केला आहे.
पाथुर्डी येथील हनुमान मंदिर येथे ग्रामसभा झाली. सरपंच अश्विनी मोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली.
या वेळी उपसरपंच प्रकाश खरात, ग्रामसेवक महेश काळे, ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी मोटे, सचिन चांगण, चांगदेव कानडे, कृषी सहाय्यक पारेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शीतलकुमार मोटे, मुख्याध्यापक महेश कांबळे, चेअरमन संतोष मोटे, पोलिस पाटील विजय कोरे,
सदाशिव तोडेकर, रोजगार सेवक विठ्ठल मोटे, अंगणवाडी सेविका पुष्पा कोरे, माजी सरपंच बाळासाहेब मोटे, चेअरमन नाना नाळे, रामभाऊ राऊत व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
त्यामध्ये ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने गाव शंभर टक्के लसीकरणयुक्त होण्यासाठी पुढील ठराव घेण्यात आले.
ग्रामपंचायतीचा ठराव
जे ग्रामस्थ कोरोना प्रतिबंधक लस घ्यायचे राहिले आहेत त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, तहसीलदार समीर माने, करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या आदेशानुसार यापुढे रेशन धान्य मिळणार नाही.
तसेच ग्रामपंचायतकडून लागणारी शासकीय कागदपत्रेही मिळणार नाहीत. तरी कृपया आपण व आपल्या कुटुंबातील जे सदस्य लस घ्यायचे राहिलेले आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन पाथुर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.(स्रोत:सकाळ)
लस घेऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा
गावात कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत तर कोरोना काळात गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्या कुटुंबांसारखी इतर कुटुंबांची अवस्था होऊ नये यामुळे लस घेऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला आहे.- शीतलकुमार मोटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पाथुर्डी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज