मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
परराज्यांतील चार ते पाच जणांच्या टोळीने विविध २८ बँकांच्या एटीएम कार्डचा वापर करून पंढरपूर अर्बन बँकेच्या राज्यभरातील २२ एटीएम मशीनमधील ३ कोटी ९ लाख रुपयांवर सामूहिक दरोडा टाकला.
बँकेच्या नियमावलीनुसार एका एटीएम काडांवरून प्रती दिन २५ हजार रुपये काढण्याची मर्यादा असताना चोरट्यांनी मात्र विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम कार्ड वापरून प्रती दिन ५ लाखांहून अधिक रक्कम काढली.
तंत्रज्ञानातील पळवाटा शोधून ही रक्कम हडप केली असल्याचे पंढरपूर बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
म्हसवड महिला अर्बन बँकेच्या एटीएम मशीनमधूनही अशाच प्रकारे पैसे काढण्यात आले होते, आता पंढरपूर अर्बन बँकेतून पैसे काढण्यात आले आहेत.
पंढरपुरातील पंढरपूर अर्बन बँकेला राज्यातील २२ एटीएममधून ५५ दिवसांत (२४ मार्च ते १९ मे २०२३) ३ कोटी ९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची फिर्याद बँकेच्या व्यवस्थापकांनी पोलिसांत दिली आहे.
कॅश डोअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण करून ५५ दिवसांत ६६८ एटीएम कार्डाद्वारे ३ कोटी ९ लाख रुपये काढण्यात आले, पण संबंधित खात्यातून ही रक्कम वजा झाली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सिस्टिममध्ये बिघाडीची शक्यता
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे चोरही स्मार्ट झाले आहेत. यापूर्वी बँकेवर दरोडा टाकत होते, बँक लुटत होते. आता तेसुद्धा तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन थेट ग्राहकांच्या खात्यातून वा एटीएममधून नव्या पद्धतीने चोरी करत आहेत. हे चोरटे परराज्यातीलच आहेत. एटीएममधून पैसे काढल्यानंतर संबंधित बँकेतून मेसेज जातो, खात्यातून रक्कमही वजा होते.
दोन महिन्यांत इतकी रक्कम काढूनही वा बँकेला कळले नसेल तर सिस्टिममध्येच तांत्रिक अडचण असणार आहे. तांत्रिक अडचणनसेल तर संबंधित पैसे काढणाऱ्यांनी चलाखीने पैसे काढण्याची शक्यता असल्याचे शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम नियोजन पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पैसे घेऊन पैसे न मिळाल्याचे भासवले
जी रक्कम यापूर्वी १५ दिवस ते महिना जात होती, ती लवकर संपल्याने आम्हाला शंका आली. आम्ही एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीला याबाबत चौकशी करण्यास सांगितले, त्यानंतर हा प्रकार समोर आला. यात चार ते पाच जणांची टोळी असावी.
त्यांच्याकडे २८ बँकांचे अधिकृत एटीएम कार्ड आहेत, हे कार्ड वापरून त्यांनी पैसे काढले, पैसे काढताना कॅश डोअरमध्ये अडथळा निर्माण केला, प्रत्यक्षात पैसे घेऊन पैसे मिळाले नसल्याचे भासवले.
तेवढीच रक्कम संबंधित बँकेकडूनही घेतली असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडे तक्रार केली आहे, पोलिस तपासातून सत्य समोर येईल. राजेश आगवणे, व्यवस्थापक, पंढरपूर अर्बन बँक.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज