टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 17 एप्रिलला मतदान पार पडलं.आज 2 मे रोजी या पोट-निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे काही तासांतच चित्र स्पष्ट होणार आहे.
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपकडून समाधान आवताडे रिंगणात उतरले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर भाजप याकडे पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व वाढवण्याची संधी म्हणून पाहत आहे.
भगीरथ भालके यांच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट, तर समाधान आवताडे यांच्याकडचा दांडगा जनसंपर्क यामुळे ही लढत अटीतटीची होण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातली 22 गावे मिळून हा मतदारसंघ बनतो. पंढरपुरातली उरलेली गावे ही माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडली आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींचा सरळ प्रभाव हा या तालुक्यांवर पडतो, असं समजलं जातं.
या पोटनिवडणुकीत अनेक उमेदवार उभे आहेत. पण मुख्य लढत ही आवताडे आणि भालके यांच्या आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारवर चहूबाजुंनी आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
वाझे प्रकरणामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत पराभव झाला तर प्रतिमेला आणखी धक्का बसू शकतो.
दुसऱ्या बाजूला पंढरपूर हे महाराष्ट्रालं मोठं तीर्थक्षेत्र आहे. नमामी गंगेच्या धर्तीवर इथं चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचं कामाचा मोठा प्रकल्प आहे. इथं मोठी बाजारपेठ आहे. अशा ठिकणी आपला आपला आमदार असावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं.
त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे, असं पंढरपूर दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक सांगतात. भगीरथ भालके यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला असला, तरी सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे. भारत भालकेंचा जनसंपर्क भगीरथ यांच्या कामी येण्याचा अंदाज आहे.
पण दुसरीकडे समाधान आवताडे यांचा स्वतःचा जनसंपर्क चांगला असल्याचं मानलं जातं. पंढरपुरातल्या सुधारक परिचारक यांच्या गटाने त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं.
यामुळेच ही लढत अटीतटीची मानली जातेय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज