टीम मंगळवेढा टाईम्स ।
कांद्याला बाजारसमितीत चांगला दर मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कांद्याची घाऊक किंमत 4393 ते 4700 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे.
कांद्याला हंगामात मिळालेला हा सर्वाधिक भाव असल्याचे सांगण्यात येत आहे. कांद्याचे दर आणखी वाढण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे 40 ते 50 टक्के पीक बहुतेक जिल्ह्यांमध्ये सडले आहे. त्यामुळे चांगले दर मिळाल्यास झालेले नुकसान भरून निघण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. आशियाची सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव येथे बुधवारी काद्याची कमाल किंमत 4134 रुपये होती,
तर किमान 1200 रुपये आणि सर्वसाधारण किंमत 3550 रुपये होती. कोल्हापूरच्या बाजार समितीत जास्तीत जास्त दर 4700 इतका होता.
कांद्याचा वापर साधारणपणे कमी असताना हा दर नवरात्रीसाठी असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शुक्रवारपासून कांद्याचे दर आणखी वाढू शकतात असे सांगितले जात आहे. किंमती वाढण्याचे कारण काय आहे?
महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले म्हणाले की, याचे मुख्य कारण मुसळधार पाऊस आणि पूर आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत एप्रिल-मेमध्ये साठवून ठेवलेले कांदे सडले.
मराठवाडा विभागातील बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर इत्यादीमध्ये ठेवलेले कांदे पूर आणि अतिवृष्टीमुळे खराब झाले. तर नाशिक, अहमदनगर, धुळे, सोलापूर आणि जळगाव येथे ओलावा असल्याने अनेक शेतकऱ्यांचे कांदे सडले.
यामुळे किमतीत वाढ झाली आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तेव्हा मागणी आणि पुरवठा यांच्यात अंतर पडते आणि किंमत वाढते.
कांदा वाचवण्याचा प्रयत्न पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांना त्यांचे जुने ठेवलेले कांदे वाचवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. कांदा सडत असल्यानं तो स्वच्छ करून त्याची प्रतवारी लावली जात आहे.
अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 50-60 रुपयांपर्यंत दर मिळाला नाही तर त्यांचे नुकसान भरून निघणार नाही, असेही दिघोले म्हणाले. कांद्याचे घाऊक दर वाढल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. कारण कांदे सडल्यामुळे त्यांचे आधीच लाखोंचे नुकसान झाले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज