टीम मंगळवेढा टाईम्स ।
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या ताब्यात असलेल्या मंगळवेढा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व जागा स्वबळावर लढेल, असा निर्धार उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी सोलापुरातील पक्षाच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला.
घुले यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीसमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, भाजपचे विद्यमान आमदार समाधन आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक गटाच्या मोठ्या ताकदीला टक्कर देत राष्ट्रवादीला सत्ता टिकण्याचे आव्हान आहे.
त्यात आता मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळाच्या जोर बैठका सुरू केल्याने राष्ट्रवादीसमोरील आव्हान आणखी कठीण होणार आहे.
मागील निवडणुकीत राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार असताना रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा व (स्व.) आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भालके यांच्या समर्थकांनाच काँग्रेसमधून, तर काही समर्थकांना राष्ट्रवादीमधून संधी देण्यात आली होती.
दोघांच्या युतीत नगरपालिकेत सत्ता राखताना राष्ट्रवादीचा थेट नगराध्यक्ष निवडून आला होता. नगरपालिका निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक असतानाच काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा दिला आहे.
भाजपचे आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांमधून नगरपालिका निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी केली जात असताना काँग्रेसच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढणार आहे.
राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत व्यक्त झालेली खदखद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजूनही मनावर घेतली नसल्यामुळे राष्ट्रवादीला राजकीय शत्रूंशी लढण्याबरोबरच स्वकीयांशी लढावे लागते की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे.
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील सरसावले आहेत. काँग्रेस भवनमध्ये महिला जिल्हाध्यक्षा शहानवाज शेख, माजी आमदार रामहरी रुपनवर प्रमुख उपस्थितीत होते.
नव्या नेतृत्त्वाला संधी, पक्षाच्या बळकटीकरणाचे दुवे सांधत आणि साधत पक्ष मजबूत करण्याचेही काम त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू केले आहे. या संदर्भातच ही बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत मंगळवेढ्याचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण काँग्रेसच्या वतीने सर्व जागा स्वबळावर लढवू, असा निर्धार केला.
माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवेढ्यामध्ये चंद्रकांत घुले व त्यांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यांनी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर आणि मोफत औषध वाटपाचे कार्यक्रम केले.
उपनगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी आपण बांधील राहून काम करू असा विश्वास त्यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला.
नगरपालिकेची आगामी निवडणूक धडाडीने कार्य करण्याची धवलसिंह मोहिते पाटील यांची पद्धत, पक्षाला उर्जा मिळवून देणारा हा निर्धार निवडणुकीचे वारे बदलणार ठरणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे
या बैठकीस तालुकाध्यक्ष अॕड. नंदकुमार पवार, मारुती वाकडे, अविनाश शिंदे, राहुल टाकणे, दगडू जाधव, मुरलीधर घुले, राजाराम सुर्यवंशी, सचिन शिंदे, दिलीप जाधव, नाथा ऐवळे, बापू अवघडे, सुनीता अवघडे, संजय वाघमोडे, परमेश्वर वाघमोडे, अण्णा ताड, अण्णा आसबे, संदीप फडतरे त्याच बरोबर पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज