टीम मंगळवेढा टाइम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये गेले.
मोदी आणि पवार यांच्यात पंतप्रधान कार्यालयात जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेतील तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र त्यात सहकार आणि बँकिंग क्षेत्राबद्दल प्रामुख्यानं चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
पंतप्रधान कार्यालयात होणाऱ्या भेटीगाठींमध्ये प्रशासकीय स्वरुपाच्या चर्चा होतात असा एक संकेत आहे. त्यामुळे या बैठकीत सहकार आणि बँकिंग क्षेत्रावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी केंद्राकडून सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. या खात्याची जबाबदारी अमित शहांकडे सोपवण्यात आली. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. ही पार्श्वभूमी पाहता याबद्दल आजच्या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि लडाखमधील सीमावर्ती भागातील चीनच्या हालचाली हे दोन मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. विरोधक हे दोन्ही मुद्दे अधिवेशनात लावून धरू शकतात. त्याच अनुषंगाने मोदी-पवारांची भेट झाल्याची चर्चा आहे.
राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी निवड झालेले पियूष गोयल यांनी कालच पवारांची भेट घेतली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील पवारांची भेट घेत त्यांना लडाखमधील चीनच्या हालचाली आणि भारताची स्थिती याबद्दल माहिती दिली.
त्यामुळे संसदेत चीन आणि शेतकरी आंदोलनाचा मुद्दा फारसा चर्चिला जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक पवारदेखील त्यांच्यासोबत होते.
या तिन्ही नेत्यांनी मोदींची भेट घेतली. यानंतर मोदी आणि ठाकरेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थेट संवाद झाला. आता मोदी आणि पवारांची भेट झाली आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या दोन नेत्यांच्या पक्षप्रमुखांशी मोदी थेट संपर्क ठेवून असल्याचं दिसून आलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज