मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यशासन वेळकाढूपणा करीत आहे. तसेच ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करून सत्ता टिकविण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. मात्र, मराठा समाजाने आता पुन्हा एकजूट दाखवून शासनावर दबाव निर्माण करण्याची गरज आहे.
त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. यासाठी राज्यातील प्रत्येक गावात 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आ.नरेंद्र पाटील यांनी केले.
मराठा आरक्षणासाठी होत असलेली चालढकल यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असावी? यासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी मराठा समाजाची बैठक झाली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, विद्यमान सरकार सध्या मराठा समाजाकडे दुर्लक्ष करीत आहे, तर यामध्ये मराठ्यांचा पक्ष म्हणूनही काही पक्ष सामील आहेत. त्यांनीही आता समाजाकडे लक्ष द्यावे, असा अप्रत्यक्ष टोला नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.
विद्यमान सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त करून समाजावर अन्याय केला आहे. तसेच त्यासाठी एक रुपयाचीही आर्थिक तरतूद केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सारथी संस्था ही बंद पाडण्याच्या विचारात सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शासनाला मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात उपोषण करण्यासाठी मराठा समाजाने सज्ज रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी माऊली पवार, राम गायकवाड, नगरसेवक अमोल शिंदे, किरण पवार, दास शेळके, आनंद जाधव, प्रताप कांचन आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे जवळपास 1300 प्रकरणे दाखल झाली आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक कर्ज प्रकरणे 800 ही टॅ्रक्टर मागणीची आहेत.
त्यामुळे मराठा तरुणांनी वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळावे. हे महामंडळ केवळ टॅ्रक्टर महामंडळ होऊ नये, अशी भीती नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना काही ओबीसी नेत्यांना पुढे करुन ओबीसीविरुध्द मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यशासनाकडून केला जात आहे.
त्यामुळे शासनाने मराठा समाजाच्या मूळ मागणीकडे लक्ष द्यावे. वेगवेगळ्या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी शासनाला दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज