मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली. हाती काहीच लागणार नाही या विवंचनेत असलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली.
तालुक्यातील मुस्ती, तांदूळवाडी, पिंजरवाडी, संगदरी या परिसरात यंदा अतिवृष्टी झाली. सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिके नष्ट झाली.
त्यामुळे चिंतेत असणाऱ्या चंद्रकांत गुरुपादप्पा माळगे (वय ७५) या वृद्ध शेतकऱ्याने रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान शेतातील वस्तीवर गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
मृत चंद्रकांत माळगे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांची तीन एकर जिराईत जमीन होती. या जमिनीत त्यांनी उडीद, मूग आणि कांदा ही पिके घेतली होती. अतिवृष्टीमुळे सर्वच खरीप पिकांची नासाडी झाली. काहीच उत्पन्न मिळणार नाही या विवंचनेत ते होते.
गेले काही दिवस याच विचाराने त्यांना ग्रासले होते. शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. एकुलता एक मुलगा तोही शेतीवर अवलंबून आहे, पुढे करायचे काय, असा त्यांना प्रश्न पडला होता.
मृत शेतकरी चंद्रकांत माळगे यांच्या शेतातील संपूर्ण पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते. याबाबत त्यांनी आपल्या पुतण्याकडे खंत व्यक्त केली होती. असं झालं तर जगायचं कसं ? जगून तरी काय उपयोग ? अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. अखेर रविवारी त्यांनी शेतातच गळफास लावून घेतला.
पिकाचा पंचनामा केला
मुस्ती परिसरात यंदाच्या हंगामात खूप पाऊस झाला. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी अनुक्रमे ७५ मिली, ६५ मिली पावसाची नोंद झाली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले आहेत. चंद्रकांत माळगे यांच्याही शेतातील पिकाचा पंचनामा केला आहे.- किरण जमदाडे, तहसीलदार
वारसांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल
मृत शेतकरी चंद्रकांत माळगे यांच्या शेतातील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तातडीने घटनेचा पंचनामा केला आहे. मृत शेतकऱ्याच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल.-गजानन स्वामी, कृषी सहायक, मुस्ती
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज