बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.
दुसरीकडे महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे.
दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
बिहारमध्ये मंगळवारचा संपूर्ण दिवस हा एनडीए आणि महाआघाडी यांच्यातल्या चुरस पाहण्याचा होता. कारण सुरुवातीला जसे कल हाती येऊ लागले तेव्हा महाआघाडी जिंकते आहे असं दिसू लागलं होतं.
मात्र त्यानंतर हे चित्र बदललं. झुकतं माप एनडीएकडे जाऊ लागलं. दरम्यान एनडीए बहुमताकडे जाईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महाआघाडीही त्यांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसली. रात्रीपर्यंत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल असेही अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवले.
मात्र तसं काहीही न घडता एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालं आहे.
विजयासाठी १२२ जागांची आवश्यकता होती. अशात एनडीएने १२५ जागांवर विजय मिळवत आपली सत्ता राखली आहे. दरम्यान काल रात्री उशिरा मतमोजणीच्या निकालांमध्ये नितीश कुमार ढवळाढवळ करत असल्याचा आरोप महाआघाडीने केला.
राजद आणि काँग्रेस नेत्यांचं एक शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलं होतं. आमच्या अनेक उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं आणि प्रमाणपत्र घ्यायला जेव्हा ते उमेदवार गेले तेव्हा त्यांना वाट बघायला सांगून नंतर पराभव झाल्याचं सांगण्यात आल्याचा आरोपही महाआघाडीने केला.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तसंच आमच्यावर मतमोजणी करताना कोणताही दबाव नव्हता असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.(लोकसत्ता)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज