टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिक्षकांसह सरकारी नोकर आपल्या पाल्यांना खासगी नर्सरी व शाळांमध्ये दाखल करण्यास प्राधान्य देतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यांच्या कन्येस हत्तूर (ता.दक्षिण सोलापूर) येथील अंगणवाडीत दाखल केले आहे. या माध्यमातून त्यांनी शिक्षकांसह सरकारी नोकरदारांपुढे एक चांगला आदर्श घालून दिला आहे.
बहुतांश प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीऐवजी खासगी नर्सरी व जिल्हा परिषद शाळेऐवजी खासगी शाळांत प्रवेशास प्राधान्य देतात. विशेष म्हणजे आपण नेमणुकीस असलेल्या शाळेतही आपल्या पाल्यांना घालत नाहीत, हे वास्तव आहे. त्यासाठी नेमणुकीच्या ठिकाणी न राहता शहरात स्थलांतरित होतात.
तेथील खासगी नर्सरी व शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतात. पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपली कन्या ईशाला आजी आशा आव्हाळे यांच्यासोबत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या हत्तूर येथील अंगणवाडीत पाठविले.
तेथील सेविकांनी तिचे फूल देऊन स्वागत केले. तसेच तिचे औक्षण करून साखर भरवले. त्यानंतर तिने अंगणवाडीत मुलांमध्ये ती रमली. ती तिथल्या गीत, कृतिगीतात रमली. तसेच तिने अंगणवाडीतील खिचडीही खाल्ली.
शिक्षणाचा पाया अंगणवाडीतून पक्का होतो. त्यामुळे जिल्ह्यात आदर्श अंगणवाडी बनविण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे. त्यासाठी यंदापासून माझी अंगणवाडी आनंदवाडी ही संकल्पना राबविली जात आहे.
यावरुन सीईओंनी महिला व बालविकास विभागाकडे लक्ष पुरवले आहे. केवळ प्रयत्न करून न थांबता आपल्या कन्येलाही अंगणवाडीत पाठवून आपले प्रयत्न हे कृतिशील असल्याचे दाखवून दिले आहे.(स्रोत:सकाळ)
कर्मचाऱ्यांवर माझा विश्वास
माझ्या मुलीला जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीतच पाठविणार आहे. आज हत्तूरच्या अंगणवाडीत पाठविले. ते अतंर जास्त आहे. त्याहून जवळच्या अंगणवाडीत पाठविण्याचा विचार आहे. मीही सामान्य कुटुंबातून आले असून जिल्हा परिषदेच्या शाळेतच माझेही शिक्षण झाले आहे. त्यामुळे माझ्या मुलीच्या मनात मी इतरांपेक्षा वेगळी आहे,
या भावनेतून कोणताही दुरावा निर्माण होऊ नये. लहानपणापासूनच ती भावना तिच्या मनात रुजायला हवी. तसेच मी जिल्ह्याची प्रमुख म्हणून काम करताना माझ्या कर्मचाऱ्यांवर माझा विश्वास आहे.- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज