मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यातील नगरपरिषदा व नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक तब्बल 9 वर्षांनंतर होत असल्यामुळे मतदारांसह भाजप व महाविकास आघाडी गोटात उत्सुकता असून,

प्रत्यक्ष निवडणुकीचे वेळापत्रक काल जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत केवळ बारा दिवस प्रचाराला मिळणार असल्यामुळे राजकीय पक्ष व स्थानिक आघाड्यामध्ये हालचालीस वेग आला आहे.

पूर्वी होती काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता, आता असणार वेगळे चित्र
संतांची नगरी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.
एकूण मतदार २८६३८ असून पुरुष १४२५१ व स्त्री १४३८५ व इतर २ मतदार आहेत. १० प्रभागांमध्ये १० पुरुष आणि १० महिलांना संधी मिळणार आहे.

प्रत्येकजण सावध पवित्रा घेऊन या निवडणुकीची आखणी करीत आहे. मंगळवेढा नगरपालिकेत २०१६ साली झालेल्या निवडणुकीत १७ नगरसेवक आणि नगराध्यक्ष अरुणा माळी या थेट जनतेतून निवडून आल्या होत्या.

शेवटची सत्ता तत्कालीन काँग्रेसचे आमदार स्वर्गीय भारत भालके, राहुल शहा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती.
३१ डिसेंबर २०२१ रोजी मंगळवेढा नगरपालिकेच्या नगरसेवकांची मुक्त संपल्यापासून नगरपालिकेवर प्रांताधिकारी प्रशासक आहे. मंगळवेढा नगरपालिकेचे राजकारण हे पक्षापेक्षा आघाड्यांवर चालत असल्यामुळे गत निवडणूक वगळता, यापूर्वीच्या कोणत्याच निवडणुकीत राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर आघाडी करून कारभार हाकल्याचे यापूर्वीचे चित्र आहे.

प्रशासकाचा कालावधी सुरू असताना विधानसभेच्या निवडणुकीत १७ नगरसेवकापैकी शहरातील निर्णायक असणाऱ्या ७ नगरसेवकांनी आमदार आवताडे यांना जाहीर मदत केल्यामुळे ते आमदार आवताडे यांच्या गटाशी जुळवून घेणार का? आघाड्यांकडे वळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नगरपालिकेचे राजकारण हाताळणारे अजित जगताप हे विधानसभेपासून आमदार आवताडे यांच्या सोबत असून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास आम्हाला पर्याय खुले असल्याचे ते स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत.

तर जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे व भगीरथ भालके यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवली असून भूमिका स्पष्ट केली नाही.
दरम्यान, समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार असल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजप कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार हे जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
त्यामुळे भाजपकडून तेजस्विनी कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात असले तरी कदम यांना भाजप कडून उमेदवारी मिळाल्यास अजित जगताप काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










