टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या गर्दीच्या सभा झाल्या आहेत. दरम्यान, आता मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यात दररोज रुग्ण वाढत असून त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. निवडणुकीनंतर मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यात रुग्ण खूप वाढतील, अशी शक्यता प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली होती. त्याचा प्रत्यय हळूहळू येत आहे.
दरम्यान, लक्षणे असलेल्या व्यक्तींनी आजार अंगावर न काढता तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, कोरोना टेस्ट करून घ्यावी, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हाताची स्वच्छता राखावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सोलापूर शहर-जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 80 हजारांकडे वाटचाल करू लागली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णांचा आलेख वाढत असून मृत्यूही वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
रविवारी अक्कलकोट व माढा तालुक्यातील प्रत्येकी तीन, बार्शी, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक चार तर सांगोल्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे करमाळा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर तालुक्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत शहरातील 896 तर ग्रामीणमधील एक हजार 398 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज