मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी होणार असून, ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

अलीकडेच शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी, आठवीऐवजी पूर्वीप्रमाणेच चौथी, सातवी या वर्गांसाठी घेतली जाणार आहे,

तर यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणून चौथी, पाचवी, सातवी, आठवी या चारही वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक, अर्ज प्रक्रिया, विद्यार्थी पात्रता याबाबतचा तपशील अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला.

त्यानुसार, पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. त्यात पहिल्या सत्रात प्रथम भाषा, गणित या विषयांची, तर दुसऱ्या सत्रात तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची परीक्षा होणार आहे.

प्रथम भाषा, तृतीय भाषा प्रत्येकी ५० गुणांसाठी, तर बुद्धिमत्ता चाचणी, गणित हे विषय प्रत्येकी १०० गुणांसाठी असणार आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह, १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह, १६ ते २३ डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह आणि २३ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अतिविशेष विलंब शुल्कासह भरता येणार आहे.

परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत, ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, आधार नोंदणी क्रमांक अनिवार्य आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्याचा बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही.
मात्र, विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यास संबंधित विद्यार्थ्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाइन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरता येणार नाही.

जिल्हा परिषद, मनपा निधीतून विद्यार्थ्यांचे अर्ज भरणाऱ्या शाळांनी शुल्काची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सीटीईटी, शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्याची घोषणा नुकतीच केली. त्यामुळे आता सीटीईटी आणि शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













