जुन्या कांद्याचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे साठवलेला जुना कांदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. मार्केटयार्डच्या घाऊक बाजारात जुन्या कांद्याची 80 ट्रक आवक झाली, तसेच 25 ट्रक नवीन कांद्याची आवक झाली.
जुन्या कांद्याची आवक वाढल्याने घाऊक बाजारात दहा किलो जुन्या कांद्याला 200 ते 300 रुपये असा दर मिळाला. 80 ते 90 रुपये किलोपर्यंत गेलेल्या जुन्या कांद्याची किरकोळ बाजारात 40 रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे.
दिवाळीनंतर जुना कांदा शंभरीपार करेल, अशी शक्यता होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जुन्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली.
आठवड्यापूर्वी नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला. पुढील आठ ते दहा दिवसांत नवीन कांद्याची आवक वाढणार असल्याने साठवणुकीतील जुन्या कांद्याला मागणी राहणार नाही,
हे लक्षात आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली, अशी माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
दरम्यान, नवीन कांद्याची आवक वाढल्यानंतर राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये जुना कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविण्यात येत आहे, असे पोमण यांनी सांगितले.
साठवणुकीतील जुन्या कांद्याची प्रतवारी खालावत आहे. नवीन कांद्याची आवक वाढत असून अशा परिस्थितीत ग्राहक चांगल्या प्रतीचा नवीन कांदा खरेदी करतील. पुढील आठवडाभरात बाजारात सर्वत्र नवीन कांदा दिसणार आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या भावात मोठी घट झाली आहे.
किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचे प्रतिकिलोचे भाव चाळीस, तर नवीन कांद्याचे भाव 25 ते 30 रुपयांदरम्यान आहेत.- रितेश पोमण, कांदा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, पुणे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज