टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील विमाधारक शेतकरी 2019-20 साली भरलेल्या रब्बी हंगामातील हवामान आधारित फळपीक विम्यापासून वंचित आहेत.
शेजारील जत तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील म्हणजेच आंबे बहारातील फळपीक विमा तीन महिन्यांपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
पण जत तालुक्यापेक्षा दुष्काळी व अवर्षणग्रस्त अशा मंगळवेढा तालुक्याकडे विमा कंपनीने डोळेझाक केल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजीचा सूर आहे.
मंगळवेढा तालुक्यामधील सात मंडळातील एकूण 3 हजार 722 शेतकऱ्यांनी 2019-20 या मोसमात हवामानावर आधारित फळपीक विम्याचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केले होते.
खराब हवामान अवकाळीचा तडाखा तसेच कोरोनाचे संकट आणि पडलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.
निसर्गाच्या व कोरोनाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून दिलासा मिळेल व किमान पुढील बहार धरण्यासाठी थोडेफार पैसे हाताला लागतील अशी अपेक्षा होती.
पण अद्यापही विमा कंपनीने शेकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नसल्याने शेतकऱ्यांनी दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील बोराळे 106, हुलजंती 2162, मंगळवेढा 250, मारापूर 185, मरवडे 388, आंधळगाव 175, भोसे 456 शेतकरी असे मंगळवेढा तालुक्यातील 3722 शेतकऱ्यांनी विमा भरला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आवाज उठवणारा आमदार म्हणून दिवंगत भारत भालके यांची ओळख होती. मागील वेळेस आणेवारी कमी करून शेवटच्या क्षणी मंगळवेढा तालुका विम्यासाठी पात्र करण्याचे काम भालके यांनी केले होते.
त्यांच्या निधनानंतर तालुक्यातील विशेषतः शेती प्रश्नासाठी शेतकऱ्यांचा वाली कोण ठरणार, हे येणाऱ्या काळात पाहावे लागणार आहे. दरम्यान, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी सदर विम्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंमंत्री व कृषिमंत्र्यांशी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज