टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर तालुक्याती दुष्काळी शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याऐवजी अश्रू आणण्याचे काम राजकीय नेत्यांनी केले आहे. उजनी धरणाचे बारमाही असलेले धोरण मराठवाड्याला पाणी दिल्याने आठमाहीवर आले आहे. तालुक्यातील जमिनी पुनर्वसनासाठी संपादित केल्यावरही तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याची खंत उद्योजक समाधान आवताडे यांनी व्यक्त केली.
संत दामाजी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचा पाणीप्रश्नाशी फारसा संबंध नाही, असा आरोप त्यांचे राजकीय विरोधकांकडून नेहमीच करतात. पण, उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याबाबतच्या पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निर्णयाला आवताडे यांनी तीव्र विरोध केला आहे.
दोन्ही तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रसंगी न्यायालयीन दरवाजा ठोठावण्याची इशारादेखील समाधान आवताडे यांनी दिला आहे.
उजनी धरणाच्या पाण्यापासून मंगळवेढा तालुक्यातील काही भाग अजूनही वंचित आहे. त्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी 2003 मध्ये बंद करून आवाज उठवला होता.
मात्र, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अशा परिस्थितीत 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बहिष्काराचे अस्त्र उगारण्यात आल्याने राजकीय खळबळ उडाली. त्यानंतर 35 गावांसाठी उजनी धरणातील पाण्यातूनच मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या योजनेसाठी गेल्या काही वर्षापासून राजकीय पातळीवर चालढकल व उदासीनता दिसून येत आहे, अशा परिस्थितीत उजनी धरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. कालव्यासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदलादेखील अद्याप मिळालेला नाही. पण, मंगळवेढा तालुक्याच्या हिश्शाचे पाणी आजही मिळत नसल्याची खंत तालुक्यातील नागरिकांमध्ये आहे.
पाणीप्रश्नाबाबत राजकीय पातळीवर आवाज उठवला जात नसल्याची खंत तालुक्यातील जनतेमधून नेहमी व्यक्त होत आहे. असे असतानाच आज दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी यासाठी लढा उभारण्याची घोषणा केली आहे.
ते म्हणाले की , पुणे जिल्ह्यातील सांडपाणीच्या नावाखाली उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी नेण्याचा घाट पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी घातला आहे. वास्तविक पाहता हे सांडपाणी यापूर्वी येत नव्हते का? आत्ताच सांडपाणी कुठून आले? आणि त्या सांडपाण्यावर पुण्याचाच हक्क कसा? असा सवाल उपस्थित करत आमच्या हिश्शाचे असणारे पाणी न देता आमचे पाणी पळविले जात आहे.
दरम्यान, मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने राजकीय वजन वापरत ते पाणी आम्ही ते पाणी नेऊ देणार नाही. प्रसंगी जनआंदोलन उभारू, तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारादेखील समाधान आवताडे यांनी या वेळी दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज