टीम मंगळवेढा टाईम्स ।
आणखी एक वर्ष सरले आणि नवे वर्ष सुरू झाले आहे. परंतु कोरोना महामारी ओसरण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे २०२२ या वर्षातही माणसाला कोरोना महामारीचा सामना करावा लागणार आहे.
या नकारात्मक वातावरणात मोठी आशा, अपेक्षा असलेल्या नव्या संधी, सकारात्मक आव्हाने भारताकडे उपलब्ध आहेत. त्याचा घेतलेला हा धांडोळा.
राष्ट्रपती निवडणूक
२०२२ मध्ये भारतात राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. देशाच्या १७ व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जुलै २०२२ पर्यंत या पदावर विराजमान असतील. राज्यघटनेच्या अनुच्छेद ५६ (१) अंतर्गत राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. त्यानंतर निवडणूक घेतली जाते.
अमृत महोत्सव
२०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारने अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत सरकार आपल्या नागरिकांना इतिहास, संस्कृती आणि आपल्या सकारात्मक गोष्टी संपूर्ण जगासमोर प्रदर्शित करणार आहे.
अमृत महोत्सव १२ मार्च २०२१ रोजी सुरू करण्यात आला असून तो १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या महोत्सवाचे नेतृत्व करत आहेत.
सात राज्यांमध्ये निवडणूक
भारतात या वर्षी एकूण सात राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्यात निवडणूक होणार आहे. तर वर्षाच्या अखेर हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होईल.
या सर्व विधानसभा निवडणुका भाजप, काँग्रेस तसेच प्रादेशिक पक्षांना २०२४ रोजी होणार्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपली ताकद आजमावण्याची संधी असेल.
अंतराळात मिळणार मोठे यश
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने २०२२ मध्ये दोन मानवविरहित मोहिमा पूर्ण करण्याची योजना बनवली आहे. त्यानंतर संस्थेकडून या वर्षाच्या शेवटी गगनयान मोहिमेचे अनावरण करण्याची योजना आहे.
भारतातर्फे अंतराळात पाठविले जाणारे पहिले मानवविरहित यान असेल. ही मोहीम २०२१ मध्ये पाठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना महामारीमुळे त्याला विलंब झाला आहे.
जी-२० चे अध्यक्षपद
परदेशात भारतासाठी हे महत्त्वाचे वर्ष सिद्ध होणार आहे. जी-२० देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. कोरोना महामारीच्या काळात भारताकडे जगाला आपली भूमिका मांडण्याची संधी मिळणार आहे. जी-२० च्या देशांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत.
जी-२० बैठक खासगी स्वरूपाची असते. पंतप्रधान मोदी यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी-जिनपिंग यांच्यासोबत थेट चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
अनेक क्रीडा स्पर्धा
२०२२ हे वर्ष भारतासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः भारतासाठी तीन मोठ्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये चीनमधील बीजिंग येथे विंटर ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
त्यानंतर २८ जुलै ते ऑगस्टपर्यंत इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणार आहे. दोन महिन्यांनंतर म्हणजेच सप्टेंबरमध्ये आशिया स्तरावर क्रीडा स्पर्धांमधील सर्वात मोठे आयोजन आशियाई क्रीडा स्पर्धा १० ते २५ सप्टेंबरपर्यंच चालणार आहेत.
या वेळी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान चीनमधील हांग्झू या शहराला मिळाला आहे.
५ जी चा चंचूप्रवेश
दूरसंचार मंत्रालयाने गेल्या वर्षी डिसेंबर अखेरी घोषणा केली आहे की, २०२२ च्या मध्यात ५जी इंटरनेट सेवेचे अनावरण केले जाणार आहे. सुरुवातीला ही सेवा १३ शहरांमध्ये दिली जाणार आहे.
यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. सध्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तीन कंपन्या परीक्षण करत आहेत.
क्रिकेटमध्ये आणखी संधी
भारतीय क्रिकेट संघाला २०२२ मध्ये अनेक संधी मिळणार आहेत. मार्चमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी एका मोठ्या स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंड करणार आहे. चार मार्च ते तीन एप्रिलपर्यंत महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये भारतीय महिलांचा क्रिकेट संघ चषकाचा दावेदार म्हणून उतरणार आहे. तसेच दुसर्या वर्षीच टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी-२० विश्वचषक १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
पंतप्रधान मोदी परदेश दौर्यांवर
भारतासाठी परराष्ट्र व्यवहारासंदर्भात या वर्षी अनेक संधी चालून आल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान जर्मनीचा दौरा करणार आहेत. तिथे ते सहाव्या इंडो-जर्मन आंतरसरकारी चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत.
यादरम्यान पंतप्रधान जर्मनीच्या चान्सलर ओलाफ सुल्ज यांचीही भेट घेणार आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये मोदी क्वाड देशांच्या दुसर्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या वर्षी ही परिषद जापानमध्ये होणार आहे.
यामध्ये अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियाचे नेते एकाच मंचावर येणार आहेत. तसेच पंतप्रधान या वर्षी कंबोडिया येथे होणार्या आसियान परिषदेतही सहभागी होणार आहेत.
कतारमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक
फुटबॉलची सर्वात मोठी समजली जाणारी विश्वचषक स्पर्धा कतारमध्ये होणार आहे. या वर्षी फिफा विश्वचषकाचे आयोजन २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ही स्पर्धा प्रथमच या महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे.
फ्रान्सचा संघ विश्वचषकाचे विजेतेपद कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. तर लियोनल मेस्सीसारखे मोठे खेळाडू आपल्या शेवटच्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या उद्देशाने उतरणार आहेत.(स्रोत:इंडिया दर्पण)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज