टीम मंगळवेढा टाईम्स ।
बारावी विद्यार्थ्यांना पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी पर्यवेक्षकांना दिलेल्या पेपर तपासण्याच्या सूचना छापण्यात आल्या होत्या. अखेर बोर्डाला चूक लक्षात आली असून, सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे.
बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरमधील तीन प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे पहिलाच पेपर देताना विद्यार्थी संभ्रमात सापडले होते. त्या प्रश्नांचे नेमके काय उत्तर लिहावे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा होता.
बहुतेक विद्यार्थ्यांनी ही बाब पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. काहींनी आहे तशाच सूचना उत्तरपत्रिकेत लिहिल्याचेही सांगण्यात आले.
इंग्रजी पेपरमधील पान नं. १० मध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. प्रश्न क्र. ए- ३ इंग्रजी कवितेवर आधारित हवा होता; पण त्याजागी तपासणाऱ्याला सूचना छापून आली होती.
ए- ४ ला कवितेवर आधारित प्रश्न अपेक्षित असताना त्याऐवजी उत्तरच छापण्यात आले होते. तर ए- ५ हा प्रश्नदेखील २ गुणांचा होता आणि येथे देखील प्रश्नांऐवजी तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या होत्या. या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय, हा प्रश्न दिलेला नाही.
तसेच हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवलाच नाही. दरम्यान, प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजीचे विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत संयुक्त सभा झाल्यावर सरसकट गुण देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी सध्या शिक्षकांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे इंग्रजीचे विषयतज्ज्ञ व सर्व विभागाचे चिफ मॉडरेटर (मुख्य नियामक) आणि अभ्यासमंडळ सदस्यांच्या संयुक्त सभेत अंतिम निर्णय घेतला जातो.
पण, शिक्षकांच्या आंदोलनामुळे संयुक्त सभा लांबणीवर पडली आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये, त्यांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी दिली.
इयत्ता बारावीचा इंग्रजीचा पेपर ८० गुणांचा असून तत्पूर्वी २० गुणांची तोंडी तथा मौखिक परीक्षा महाविद्यालय स्तरावर पार पडली आहे. त्यात बहुतेक विद्यार्थ्यांना सरासरी १५ ते १८ गुण मिळतात.
दुसरीकडे बोर्डाकडून लेखी परीक्षेत सहा गुणांचा प्रश्न चुकीचा छापून आल्याने ते सहा गुण आता सरसकट मिळणार आहेत. त्यामुळे इंग्रजी विषयात उत्तीर्ण होण्याची चिंता असलेल्या विद्यार्थ्यास ७४ गुणांपैकी १४ गुण मिळाले की तो विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर यंदा इंग्रजी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज