टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अतिदुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधूनदेखील त्याकडे काणाडोळा केला.
मागील विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी शरद पवार आले असता त्यांनी या ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली होती. आता त्यांनी हा प्रश्न बेदखल केल्यामुळे या भागातील दुष्काळग्रस्त जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
मागील २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांमधील पाण्याचा प्रश्न गाजला होता. स्थानिक जनतेने एकजूट दाखवून आक्रमक पवित्रा घेत सोलापूर लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.
एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष निवडणुकीत त्याप्रमाणे कृतीही हाती घेतली होती. परंतु त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची ग्वाही दिल्यानंतर मतदानाच्या दिवशी दुपारनंतर मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यात आला होता.
त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत याच ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा प्रतिष्ठेचा बनला असता त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना त्याकडे पुन्हा एकदा लक्ष घालावे लागले. विधानसभा निवडणुका होताच या ३५ गावांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती.
परंतु त्यावेळी या मतदारसंघातून उभे राहिलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता.या पाश्र्वभूमीवर मंगळवेढय़ातील या ३५ गावांच्या पाणी प्रश्नाकडे शरद पवार यांनी दुर्लक्ष केले.
तथापि, विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही मोहिते-पाटील यांनी मात्र या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला असता शासनाने या ३५ गावाच्या पाण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली.
परंतु पुढे काहीच मिळाले नाही. या भागासाठी उजनी धरणातून दोन टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी मोहिते-पाटील यांनी लावून धरली खरी; परंतु जलसंपदा खाते राष्ट्रवादीच्या ताब्यात असूनही मंगळवेढा भागाला न्याय मिळू शकत नाही.
सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगोला व मंगळवेढा तालुक्याचा दौरा केला असता त्यांच्याकडे मंगळवेढय़ातील जनतेने ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न कधी सोडविणार, असा सवाल उपस्थित केला.
याच मंगळवेढा भागातून यापूर्वी वीस वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले व सध्या मोहोळचे आमदार असलेले सोलापूरचे पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी या प्रश्नावर पवार यांचे लक्ष वेधले.
मंगळवेढा-पंढरपूरचे दिगवंत आमदार भारत भालके यांनीही पोटतिडकीने हा प्रश्न पवार यांच्यासमोर मांडला. परंतु त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने सर्वाचा हिरमोड झाला, तर स्थानिक दुष्काळग्रस्त जनतेच्या भावना तीव्र झाल्याचे सांगण्यात आले.
आजपर्यंत नुसती आश्वासने
२००९, २०१४, २०१९ प्रत्येक विधानसभेला प्रचारासाठी पवार आले, आश्वासन देऊन गेले पण ३५ गावकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली गेली हे भीषण वास्तव आहे.
हाच धागा पकडून आजच्या सभेत आ. प्रशांत परिचारक यांनी बारामती-इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी 5 हजार कोटींचा निधी मिळतो तर मग राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जलसंपदा खात्याकडून मंगळवेढ्याच्या 35 गावच्या योजनेसाठी तरतूद का नाही असा जाहीर सवाल उपस्थित करून पाणीवाटपात झालेला अन्याय जनतेसमोर आणला आहे.
कोरडा नदीला पाणी देऊ
२०१३ सालच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगोला व मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे मंगळवेढय़ातील जनतेने ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न कधी सोडविणार, असा सवाल उपस्थित केला होता.
परंतु त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने सर्वाचा हिरमोड झाला, तर त्यावेळी स्थानिक दुष्काळग्रस्त जनतेच्या भावना तीव्र झाल्या होत्या.
पवार यांनी दिलेल्या या हमीप्रमाणे सांगोल्याची कोरडा नदी केव्हा पाण्याने तुडुंब भरून वाहणार, याबद्दल सांगोला तालुक्यातील दुष्काळी जनतेमध्ये उत्सुकता वाढली आहे.(स्रोत:लोकसत्ता)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज