टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी झरे येथे बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. परंतु मंगळवेढा तालुक्या तून एकही बैलगाडी गेली नसल्याचे माहिती समोर येत आहे.
आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन केले होते.
गोपीचंद पडळकर आयोजित बैलगाडा शर्यतीला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगलीच्या झरे गावात आणि सगळ्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बैलगाडा शर्यत होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती.
एका रात्रीत दुसरा ट्रॅक, सकाळी साडे पाच वाजण्याच्या शर्यत पार!
पडळकर यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला शर्यतीसाठी ट्रॅक उभारण्यात आला होता. मात्र याचा सुगावा लागताच पोलिसांनी ट्रॅक उध्वस्त केला होता. मात्र पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पडळकर समर्थकांनी तिथूनच पाच किमी अंतरावर दुसरा ट्रॅक मध्यरात्रीच्या सुमारास केला आणि सकाळी पाच वाजता ही स्पर्धा पार पडली.
या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. अजूनही आमदार गोपीचंद पडळकर शर्यतीच्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. सकाळी पावणे सातच्या सुमारास ते आपल्या घरातून बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी जायला निघाले. काही वेळातच त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
स्पर्धेनंतर पडळकर समर्थकांचा मोठा जल्लोष
गेल्या चार ते पाच दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरुन मोठं राजकारण रंगलेलं होतं. बंदी असली तरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणारच, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी मांडली होती. तर आम्ही परवानगी देणार नाही, अर्थात शर्यत पार पडणार नाही, अशी भूमिका पोलिस-प्रशासनाने घेतली होती.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
“काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज