मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातून २ ट्रॅक्टर, २ ट्रॉली, नांगर, रोटर, इंजिन तसेच तब्बल ३१ मोटारसायकली चोरणाऱ्या चौघांना शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने पकडून गजाआड केले.
त्यांच्याकडून तब्बल ३८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
सोमनाथ महादेव दुधाळ (वय २२, रा. मेटकरवस्ती, ता. सांगोला), सचिन शिवाजी सरगर (वय २२, रा. तनाळी, ता. पंढरपूर), सत्यवान रामहरी भोसले (वय ३०, रा. पडसाळी, ता.उ. सोलापूर) व सागर सुरेश चव्हाण (वय २१, रा. मोहोळ) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
शहर व तालुक्यात मोटारसायकली चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याअनुषंगाने दाखल गुन्ह्यांचा बारकाईने तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे यांना यातील सोमनाथ दुधाळ हा चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यादरम्यान त्याने साथीदारांसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सातारा, सांगली आदी भागांमधून अनेक मोटारसायकली, १ ट्रॅक्टर, १ ट्रॉली, लोखंडी पल्टी नांगर, फण,
रोटर, इंजिन पंप तसेच कर्नाटकातील अथनी येथून १ ट्रॅक्टर, ट्रॉली चोरल्याचे कबूल केले. त्यामुळे पोलिसांनी सचिन सरगर, सत्यवान भोसले, सागर चव्हाण यांना अटक केली.
कर्जबाजारीपणावर चोरीचा उतारा
यातील मुख्य सूत्रधार सोमनाथ दुधाळ हा कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे सुरूवातीला त्याने एक ट्रॅक्टर चोरला. त्याद्वारे शेतीची कामे करायचा. ही चोरी अनेक दिवस खपून गेल्याने त्याने आणखी ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच ट्रॅक्टरला लागणारी शेती औजारे चोरली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज