आजपासून देशभरात दररोजच्या गोष्टींचे नियम बदलणार आहेत. त्यात असे काही बदल आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशात होणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्यासंबंधित माहिती देत आहोत.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचे नुकसान होऊ शकते. एलपीजी सिलिंडरपासून रेल्वेच्या टाइम टेबलपर्यंत सर्व गोष्टी आज १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या नवीन नियमांबद्दल.
आजपासून गॅस बुकिंग करताना OTP लागणार
एक तारखेपासून घरगुती LPG गॅस सिलिंडर डिलिव्हरीचे नियम बदलले आहेत. (LPG Cylinder Home Delivery) आता तुम्ही गॅस बुक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठविण्यात येणार आहे.
जेव्हा गॅसची डिलिव्हरी तुमच्या घरी होईल तेव्हा तुम्हाला ओटीपी नंबर डिलिव्हरी करणाऱ्याला द्यावा लागणार. एकदा का तुमचा कोड सिस्टिममध्ये टाकला की तुम्हाला गॅस मिळण्याचा मार्ग मोकळा.
Indane गॅस बुकिंग क्रमांकात बदल
इंडेन गॅस कंपनीने १ नोव्हेंबरपासून गॅस बुकिंग करण्याच्या नंबरमध्ये बदल केला आहे. आता कंपनीच्या जुन्या क्रमांकावर सिलिंडरची नोंदणी करता येणार नाही. देशभरातील इंडेन गॅसच्या ग्राहकांना सिलिंडरची मागणी नोंदविण्यासाठी ७७१८९५५५५५ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल
सरकारी इंधन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती ठरवतात. त्यामुळे एक नोव्हेंबरपासून सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात इंधन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली होती.
रेल्वेचे वेळापत्रक बदलणार
१ नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वेतर्फे देशभरातील सर्वच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. त्याचा परिणाम १३ हजार प्रवासी आणि ७ हजार मालगाड्यांच्या वेळेवर होणार आहे. तसेच १ तारखेपासून तब्बल ३० राजधानी गाड्यांच्या वेळेतही बदल होणार आहे.
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना अतिरीक्त शुल्क
बँक ऑफ बडोदाने आता बँकेत पैसे काढणे आणि भरणे या सेवेवर शुक्ल लावण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर पासून ठरवून दिलेल्या व्यवहारांपेक्षा अधिकचा व्यवहार केल्यास प्रत्येकावर शुल्क द्यावे लागेल. बचत खातेधारकांना फक्त तीनवेळा रक्कम भरता येणार आहे. चौथ्यांदा व्यवहार केल्यास ४० रुपये द्यावे लागतील. तर कर्ज खातेधारकांनी तीन पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहाराला १५० रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. जनधन खातेधारकांना पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र पैसे काढण्यासाठी तीननंतर १०० रुपये द्यावे लागणार आहेत.
SBI च्या बचत खात्याचे व्याज घटणार
१ नोव्हेंबर पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बचत खातेधारकांच्या व्याजात कपात करण्यात येणार आहे. ज्यांच्या खात्यात एक लाखापर्यंतची रक्कम आहे. त्यांच्या व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात होईल. आता नवा व्याजदर ३.२५ टक्के असेल. तर एक लाखाहून अधिक रक्कम असणाऱ्यांना रेपो रेटनुसार व्याज मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज