मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
जिल्ह्यातील १२ नगरपालिकांचे १२ नगराध्यक्ष व २८९ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी संबंधित नगरपालिका कायालयांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर आज सोमवारपासून अर्ज अपलोड करण्यास सुरवात होणार आहे.
१७ नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे तर दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार आहेत.

संबंधित पालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष उमेदवारी अर्जाची प्रत सादर करण्याची मुभा असल्याची माहिती नगरपालिका विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डोके यांनी सांगितली.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, करमाळा, मंगळवेढा, सांगोला, बार्शी, कुर्जुवाडी, मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, दुधनी, अनगर, मैंदर्गी पालिका व पंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

१२ पालिकांमधील नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक घेतली जात आहे.

रविवारी सुटीच्या दिवशी (१६ नोव्हेंबर राजी) पालिकांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारी अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून संबंधित पालिका निवडणूक विभागात करण्यात येणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १९ ते २९ नोव्हेंबर दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. उमेदवारी अर्जावरील अपिलासाठी तीन दिवसांची मुदत असणार आहे. २६ रोजी रोजी चिन्ह वाटप व निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी जाहौर करण्यात येणार आहे.

२ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया चालेल. दरम्यान निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले.
उमेदवार अथवा सूचकास अर्ज दाखल करण्याची मुभा : अर्धवट माहितीचे शपथपत्र असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांना नोटीस देऊन छाननीवेळी सादर करण्याची सूचना करावी.

अनामत रक्कम भरल्याची पावती, त्या संदर्भातील पुरावा, शपथपत्र हे नोटरी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, तहसीलदारांनी साक्षांकित केलेले असावे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अर्जासोबतचे जोडपत्र १ व २ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेपर्यंत दाखल करण्याची मुभा आहे. उमेदवार किंवा उमेदवाराचा सूचक अर्ज दाखल करू शकतील. एका व्यक्तीला एका मतदारसंघात जास्तीत जास्त चार अर्ज सादर करता येईल.
अर्जासोबत लागणारी कागदपत्र
मालमत्ता, दायित्व, गुन्हेगारी संबंधातील शपथपत्र, विहित अपत्यासंदर्भातील शपथपत्र, राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी जोडपत्र एक व दोन, मतदार यादीतील उमेदवाराचे नाव असलेली प्रमाणित प्रत, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र.
जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी कार्यालयाकडे विहित कालावधीत अर्ज केल्याची पावतीची प्रत. तसेच सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र (उमेद्वार राखीव जागेवर निवडणूक लढवत असेल तर लागू.
अर्जासोबत तीन चिन्ह निवडावीत
उमेदवारांनी अर्जासोबत तीन चिन्हांची निवड करावी. उमेदवारांचा सूचक त्याप्रभागातील असावा, राजकीय पक्षासाठी एक सूचक, नोंदणीकृत पक्ष व अपक्ष उमेदवारांना ५ सूचक लागतील. एकाहून अधिक उमेदवार असल्यास प्रत्येक अर्जातील सूचक वेगवेगळे असतील. एकाच प्रभागात एकापेक्षा अधिक अर्जदाखल केल्यास अनामत रक्कम एकदाच भरावी.
‘या‘ संकेतस्थळावर दाखल करता येणार नामनिर्देशनपत्र
नामनिर्देशन तथा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी https://mahasecelec. in/संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर कागदपत्रांसह अर्ज विहित कालावधीत अर्ज दाखल करावयाचा आहे.
संकेतस्थळावर दाखल ऑनलाइन उमेदवारी अर्ज, पूर्ण भरलेले शपथपत्र व इतर कागदपत्रांसह दाखल अर्जाची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधित नगरपालिका कार्यालयात निर्धारित कालावधीत सादर करायचे आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










