मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
२०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. रविवारी रात्री अकरा वाजलेपासून सोमवारी पहाटेपर्यंत माडग्याळ ग्रामीण रुग्णालय, जत, कवठेमंहकाळ, सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना उमदी (ता.जत) येथील समता आश्रमशाळेत घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उमदी-जत रस्त्यालगत समता आश्रमशाळा असून रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास निवासी विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमातील शिल्लक राहिलेले जेवण देण्यात आले होते.
मात्र रात्री दहानंतर सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब होणे अशी लक्षणे दिसू लागली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका व खाजगी वाहनाने मिळेल त्या रुग्णालयामध्ये दाखल करण्याचे काम सोमवार पहाटेपर्यंत सुरू होते.
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा पहाटेपर्यंत २५० वर गेला होता. तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीसाठी मिळेल त्या वाहनाने रुग्णालयापर्यंत दाखल केले. चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी देखील पहाटेपर्यंत घटनास्थळी व रुग्णालयात थांबून मदत करत होते.
रात्री बारा वाजता तालुक्यातील अनेक सोशल मीडिया ग्रुप वर उमदी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, असा मेसेज व्हायरल झाला होता. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी याकरिता मदतीची गरज आहे, प्रत्येकाने मदत करावी, असे आवाहन केले.
ही घटना समजताच उमदी, माडग्याळ, जतसह पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येकाने पाणी, प्राथमिक उपचारासाठी औषधे, वाहने याची मदत केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून जनतेने अत्यंत चांगली मदत केली आहे.
घटनास्थळापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माता, कर्मचारी यांचा तुटवडा जाणवला. त्याचबरोबर अपुरी औषधे होती.
परिणामी विद्यार्थ्यांना व सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करताना दमछाक झाली होती. बिकट अवस्थेत ग्रामीण रुग्णातील व्यवस्था ही ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी दिसून आली. यामुळे माडग्याळ ग्रामीण रुग्णालयातील कारभारावर जनतेतून रोष व्यक्त होत आहे.
सर्वांची प्रकृती स्थिर, अफवा पसरू नये
सद्यस्थितीत आश्रम शाळेतील विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. यामुळे कोणीही चिंताजनक असल्याची अफवा पसरवू नये, असे आवाहन संबंधित आरोग्य यंत्रणेने केले आहे. दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
माडग्याळ ग्रामीण रुग्णालय – ३५, मिरज – २६, कवठेमंहकाळ – ४२, जत -८०
२४ तासात अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
माडग्याळ, जत व मिरज येथील डॉक्टरांना तात्काळ व व्यवस्थित उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेऊन व्यवस्थित औषध उपचार करण्याचे आदेश आरोग्य विभागांना देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी मेडिकल कॉलेज यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी सदर घटनेची सखोल चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.(स्रोत:पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज