टीम मंगळवेढा टाईम्स ।
पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
त्यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या सहा तालुक्यांमधील ४० महसूल मंडलांचा समावेश आहे.
पावसाचा खंड, सरासरीपेक्षा कमी पाऊस, तालुक्यातील पाणी पातळी, जमिनीवरील हिरवळ, प्रकल्पांमधील पाणीसाठा, अशा बाबींचा सॅटेलाईटद्वारे ऑनलाइन सर्व्हे पार पडला.
त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा व बार्शी या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. मात्र, अक्कलकोट व उत्तर सोलापूर वगळता उर्वरित चार तालुके दुष्काळाच्या ट्रिगर एकमध्ये होते. मात्र, ट्रिगर दोनमध्ये ११ पैकी पाचच तालुके बसले.
त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उर्वरित सहा तालुक्यांमधील तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवून घेतले. त्यावर कृषी विभागाकडून आणखी सविस्तर माहिती संकलित करून तो अहवाल सरकारला पाठविण्याची तयारी केली होती.
मात्र, जिल्हाभर दुष्काळी स्थिती असताना केवळ पाचच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने अडचणीतील बळीराजाला दुष्काळी मदत मिळावी, यादृष्टीने गुरुवारी सकारात्मक निर्णय घेतला आहे.
मंगळवेढा, उत्तर सोलापूर, मोहोळला फटकाच
उत्तर सोलापुरातील तिन्हे, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप, होटगी, निंबर्गी, विंचूर, अक्कलकोट तालुक्यातील किणी, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ तालुक्यातील कामती व वाघोली, पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर, भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळूज, तुंगत, कासेगावसह जिल्ह्यातील आणखी ४० महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आता दुष्काळ जाहीर होईल.
मात्र, मंगळवेढा, मोहोळ व उत्तर सोलापूर या तीन तालुक्यांमधील बहुतेक महसूल मंडलांमध्ये पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे कृषी विभागाकडील आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे त्याठिकाणी देखील दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कायम राहणार आहे.(स्रोत:सकाळ)
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर व मोहोळ या सहा तालुक्यांमधील ४० महसूल मंडलांचा दुष्काळात समावेश झाल्याचे समजले. त्यात कोणकोणती मंडले आहेत हे पाहून उर्वरित मंडलांसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. – कुमार आशीर्वाद. जिल्हाधिकारी, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज