मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देत भाषणाला सुरुवात केली. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाहीअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला केले.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायम मास्क लावणे, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.दिवाळीचा सण प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा.
सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आतू येऊ देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे असेही त्यांनी म्हटलं.
दिवाळीत फटाके वाजवू नका असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्याशिवाय मास्क वापरणे, मंदिर सुरु करणे, मेट्रो कारशेडवरील राजकारण, राज्य सरकारची माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम, कोरोना संकटात राज्यात झालेले मोठे करार, माजी सैनिक आणि मृत माजी सैनिकांच्या पत्नीसाठी योजना या विषयांवर संवाद साधला.
दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचे संकेत
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मी दिले आहे. सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील.
बेरोजगारांना रोजगार
लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत ऑक्टोबर अखेरपर्यंत 1 लाख 15 हजार 928 इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला.
विकेल तेच पिकेल मुळे शेतकऱ्यांना लाभ
विकेल तेच पिकेल या नव्या अभियानाचा चांगला प्रतिसाद आहे. शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे.
बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबविणार
राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या वीर पत्नींना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्यात येणार आहे. तसेच अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार कोटींची अर्थसहाय्य घोषित करण्यात येणार आहे.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली आहे. डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी म्हणजे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
कायम मास्क लावणे, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे ही त्रिसूत्री आपण विसरता कामा नये. मास्क घातला नाही तर दंड होणारच. त्यामुळे एक दक्ष नागरिक बना. आता कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून स्वत:चे आरोग्य चांगले ठेवणे आणि दुसऱ्यालाही ठेवायला भाग पाडा
संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर
दैनंदिन व्यवहारातल्या जवळपास बऱ्याच गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यासाठी कार्य पद्धती ठरवून दिली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे, जिम, व्यायामशाळा, रेस्टॉरंट सुरु झाली आहेत ग्रंथालये, वाचनालये सुरु आहेत.
मुंबईत सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. नियमित लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात रेल्वेबरोबर चर्चा सुरु आहे. तसेच दिवाळीनंतर धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे उघडण्यासंदर्भात कार्य पद्धती अंतिम होत आली आहे.
उद्योगांची मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात
कोरोनाशी सगळ्या जगाचा कडवा मुकाबला सुरु असताना महाराष्ट्राने पहिल्या टप्प्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात केली आणि १७ हजार कोटींचे करार विविध कंपन्यांसमवेत केले.
मेट्रो कारशेडवरुन मुख्यमंत्र्यांची टीका
कांजूरमार्गमधील मुंबई मेट्रो कारशेडची जमीन मिठागराची आहे, असं म्हणत आहेत, पण ती जर मिठागराची जमीन आहे, असे म्हणणाऱ्यांना एक कळत तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकत आहात. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व जे टीका करतात त्यांना समर्पक उत्तर देऊ.
मुख्यमंत्री कार्यालयात महिलांसाठी विशेष सहायता कक्ष
महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका असून मुख्यमंत्री कार्यालयात महिलांचे प्रश्न आणि समस्या निवारण तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष उभारण्याचा निर्णय
कापूस खरेदी केंद्रांना सुरुवात
राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करीत असून दिवाळीपर्यंत सर्व केंद्रे सुरु होतील. नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यात फेडरेशनची कापूस खरेदी होईल. अपेक्षित उत्पादन 425 लाख क्विंटल इतके असून 120 केंद्रे असतील. मूग, उडीद, सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरु आहे. गेल्या महिन्यातच खरेदीस सुरुवात झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज