टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांमधील मतभेद संपावेत यासाठी प्रयत्न केले होते.
परंतु, त्यांना यश आले नव्हते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही पुन्हा बंद खोलीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली. परंतु , मतभेद संपण्याऐवजी प्रमुख पदाधिकारीच हमरीतुमरीवर आले.
त्यामुळे श्री.भरणे यांना हस्तक्षेप करुन हमरीतुमरीवर आलेल्या प्रमुख मंडळींना कसबसे शांत करत बैठक गुंडाळावी लागली.
पंढरपूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुलनेने अत्यंत मर्यादित आहे. त्यातच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये विविध कारणांवरुन कमालीचे मतभेद आहेत. अशा परिस्थितीत आमदार (कै) भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती.
त्यामुळे शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली होती. परंतु भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद उफाळून आले आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी माजी आमदार (कै) औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी (कै ) भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांची निवड करण्यास आणि त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला होता.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मतभेद संपवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना यश आले नव्हते.
पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना (कै) भारत भालके यांच्या जनसंपर्कामुळे लक्षणीय मते मिळवली. परंतु पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्यात त्यांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असला की पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील मतभेद दिसून येतात.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढे देखील मतभेदाचे प्रदर्शन होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री श्री.भरणे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहातील बंद कक्षात बैठक घेतली.
या बैठकीस श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, अॅड . गणेश पाटील, अॅड . दीपक पवार , सुधीर भोसले , श्रीकांत शिंदे , संदिप मांडवे , संतोष सुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.(स्त्रोत:सकाळ)
बैठक गुंडाळावी लागली
या बैठकीचे वेळी अन्य कोणी आत येऊ नये यासाठी कक्षा बाहेर पोलिस उभा करण्यात आले होते. या बैठकीत प्रमुख पदाधिकारी तावातावाने बोलून हमरीतुमरीवर आले. बैठकीत मतभेद संपण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर चर्चा सुरु झाल्याने वाद आणखी वाढला.
हा प्रकार पाहून पालकमंत्री श्री.भरणे अवाक झाले. मतभेद संपवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पदाधिकारी हमरीतुमरीवर आल्याने त्यांना बैठक अक्षरशः गुंडाळावी लागली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज