टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि मनसेची आगामी पालिका निवडणुकांत युती होण्याच्या वावड्या राजकीय वर्तुळात उमटू लागल्या.
फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता याही भेटीवेळी उपस्थित होत्या. शिवतीर्थावरील बाल्कनीत उभारून राज आणि फडणवीस बोलत असल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत.
शिवसेनेने साथ सोडल्याने एकटे पडलेल्या भाजपला सत्ता मिळवण्यासाठी जोडीदाराची आवश्यकता आहे. त्याचवेळी मनसेच्या मराठीच्या मुद्द्यावर उत्तर भारतात पक्षाला फटका बसू शकतो, याची जाणीवही त्या पक्षाला आहे.
फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोन्ही नेत्यांनी त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली का एस. टी संपाबाबत चर्चा झाली याचा खुलासा होऊ शकला नाही.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची यापूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी ही मैत्रीपूर्ण भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले होते.
पालिका निवडणूक आणि उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक एकाच सुमारास होणार आहेत. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुका भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
त्यामुळे राज ठाकरे यांच्याशी भारतीय जनता पक्ष अधिकृत युती करणे अवघड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.(स्रोत:प्रभात)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज