टीम मंगळवेढा टाईम्स ।
बाहेर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली.
या भेटीतील तपशील गुलदस्तात असला तरी या भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व पक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा झाली.
या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या 15 मिनिटं चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
विशेष म्हणजे राणेंच्या अटक नाट्याला दोन दिवस होत नाही तोच फडणवीस-ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बैठकीत चर्चा काय?
राणेप्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.
दरम्यान, या बैठकीत राणेंबाबत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाविषयी भाजपची भूमिका स्पष्ट केली. ओबीसींच्या जनगणनेची आवश्यकता नाही हे मी आजच्या बैठकीत स्पष्ट केलं आहे.
इम्पिरिकल डेटा म्हणजे काय हे सुद्धा मी सरकारला सांगितलं आहे. त्यानुसार सरकारने कार्यवाही केली तर ओबीसींचं आरक्षण आणू शकतो. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घेऊ नका. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल.
या संदर्भात पुढच्या शुक्रवारी अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. काही कायदेशीरबाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठका होणार आहे. आम्ही बैठकांना तयार आहोत, असं फडणवीस यांनी सांगितलं
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज