टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील भीमा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून केलेला वाळू साठा पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर व त्यांच्या टीमने ताब्यात घेत वाळू उपसाप्रकरणी वापरात असलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या 6 होड्या जागेवरच नष्ट केल्या आहेत.
1 लाख रुपये किमतीची 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोडावून येथे आणण्यात आली आहे. ही कारवाई बुधवार, 23 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील आंबे-पोहोरगाव दरम्यानच्या भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता.
याची माहिती मिळताच तहसीलदार सुशील बेल्हेकर हे स्वतः कर्मचार्यांना बरोबर घेऊन पोहोरगाव येथे गेले होते. तहसीलदारांचे पथक पोहचताच वाळू उपसा करणारे लोक नदीपार करून आंबे हद्दीत गेले.
त्यानंतर तहसीलदार व कर्मचारी यांनी स्पीड बोटचा वापर करत नदीच्या पलीकडे आंबे याठिकाणी धाड घातली. तेथे बोटीद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. नदीपात्राबाहेर काठाला 1 लाख रुपये किंमतीचा 20 ब्रास वाळूचा साठा आढळून आला.
वाळू उपसा करणार्या 6 बोटी नष्ट करण्यात आल्या. 20 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. हा साठा शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे पाठवण्यात आला.
या कारवाईत तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडलाधिकारी संतोष सुरवसे, गणेश टिके, समीर मुजावर, रणजित मोरे यांच्यासह तलाठी आणि कोतवाल सहभागी झाले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज