टीम मंगळवेढा टाईम्स।
कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेविरोधात पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे.
यासंदर्भात काल जिल्हा प्रशासन आणि सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक पार पडली. बैठकीमध्ये प्रमुख पाच मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर महापूजेविरोधातील आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, कार्तिकीची विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी पहाटे अडीच वाजता होणार आहे. महापूजेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आज बुधवारी दुपारी तीन वाजता पंढरपुरात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे मागील तीन महिन्यांपासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेला विरोध केला होता.
विरोधानंतरही उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासून तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी दिला होता.
राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना महापूजेचे निमंत्रण द्यायचे, याचा पेच मंदिर समितीसमोर असतानाच, सकल मराठा समाजाने महापूजेला विरोध केल्याने महापूजेचा वाद वाढला होता.
दोन दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला यावे, अशी भूमिका घेतली होती. तर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला होता.
त्यामुळे दोन गट पडले होते. त्यानंतर वादावर तोडगा काढण्यासाठी समाजाची सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीमध्येही दोन गट आमने सामने आल्याने वाद चिघळला होता. त्यानंतर काल दोन्ही गटांनी एकत्रित येत सहमतीने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
काल मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहावर सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली.
सकल मराठा समाजाच्या वतीने प्रमुख पाच मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधातील आंदोलन मागे घेत असल्याचे उपोषणकर्ते गणेश जाधव यांनी जाहीर केले.(स्रोत:सकाळ)
प्रमुख पाच मागण्यांवर सकारात्मक निर्णय
पंढरपूर शहरात मराठा भवन उभारण्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून द्यावा
पंढरपुरात ‘सारथी’चे उपकेंद्र सुरू करावे मुले व मुलींसाठी वसतिगृह सुरू करावे, कुणबी नोंदी तपासणीचे काम वेगाने पूर्ण करावे
आरक्षण मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला वेळ द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज