टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना गुढीपाडव्यानिमित्त दिली जाणाऱ्या साखरेच्या दरात वाढ करणे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या सहकार संस्था चालवण्यातील नाकर्तेपणाचे पहिले लक्षण असल्याची टीका कारखान्याचे संचालक अशोक केदार यांनी केली आहे.
संचालक केदार यांनी सांगितले आहे की, मागच्या पंचवार्षिक कालखंडामध्ये पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने
अतिशय काटकसरीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने कारखाना चालवून जिल्ह्यामध्ये या कारखान्याचे स्थान अबाधित ठेवले होते.
आमदार आवताडे यांचे नेतृत्वाखाली कारखान्यावर संचालक मंडळ स्थापन झाल्यानंतर कारखान्यावरील कर्ज अथवा अडचणी न सांगता सर्व सभासदांना गुढीपाडवा व दिवाळीनिमित्त प्रतिकिलो १० रुपये प्रमाणे ६० किलो साखर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु गतवर्षी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे व इतर संचालक मंडळाच्या कारभाराविषयी सभासद बांधवांमध्ये गैरसमज निर्माण करून राजकीयदृष्ट्या पूर्णपणे विसंगत असणाऱ्या घटकांनी एकमेकाशी हात मिळवणे करून या कारखान्यावर सत्ता स्थापन केली.
कारखान्यावर सत्ता स्थापन केल्यानंतर सभासदांचा कोणताही विचार न करता विद्यमान संचालक मंडळाने सभासदांना दिली जाणारी साखर १० रुपये प्रति किलो साखर २० रुपये प्रति किलो केली आहे.
त्याचबरोबर ६० किलो दिली जाणारी साखर ५० किलो करून अपयशी कारभाराचा कळसच गाठला आहे. यामुळे प्रत्येक सभासदाचे ३८०० रुपये ५ वर्षात नुकसान होणार आहे.
वास्तविक पाहता कारखानदारी चालवित असताना सभासदांनी १० रूपये किलो साखर मिळते म्हणून अनेक कोटुंबिक अडचणी बाजूला ठेवून, प्रसंगी व्याजाने काढून सभासदत्व घेतले आहेत.
विद्यमान संचालक मंडळाने याबाबीचा विचार करायला हवे होते. सभासदांच्या साखरेचे दर वाढवून कारखान्यावरील कर्ज कमी होणार नाही.त्यासाठी मागील संचालक बोर्डाने ज्याप्रमाणे दिर्घकालीन उपयोगाची सायलो सिस्टीम तयार केली.
त्याप्रमाणे मंजूर असलेले आसवानी प्रकल्पासारखे उपपदार्थ तयार करणारे प्रकल्प राबवून कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारता येण्यासारखे आहे.
संचालक मंडळाने सर्वसामान्य सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरून हा दरवाढ करण्याचा असंवेदनशील असा निर्णय घेतला आहे. मोठ्या आशेने नव्याने सभासदत्व स्वीकारलेले सभासद व पूर्वीच्या सभासद यांची या संचालक मंडळांनी घोर निराशा केली आहे.
परंतु प्रत्यक्षात कारभार हातात घेतल्यानंतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशी काहीशी अवस्था झालेल्या संचालक मंडळास आपल्या सहकार क्षेत्रातील कारभारावर स्वतःच प्रश्न निर्माण करून आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक व शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अस्तित्व जिल्ह्यामध्ये कायम टिकून राहिले पाहिजे ही भूमिका घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी पाच वर्षांमध्ये कोणत्याही अडथळाविना कारखान्याचा कारभार चालवून दाखवला होता.
निसर्गचक्र विविध प्रकारची रोगराई अशा संकटकाळामध्ये सभासदांनी दहा हजार रुपये भरून सभासदत्व घेतले आहे त्यामुळे सभासदांची कोणत्याही प्रकारे आर्थिक कुचंबना न करता त्यांना त्यांच्या हक्काची व माफक दरामध्ये साखर मिळाली पाहिजे.
सभासदांना उत्तम प्रतीची साखर आम्ही देऊ असा बडेजाव मिळवणाऱ्या विद्यमान संचालक मंडळाने चांगल्या प्रतीची साखर म्हणजे कोणती साखर याचा खुलासा करणे ही गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या नेटवर्कमध्ये साखर उत्पादनासाठी नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या दामाजी साखर कारखान्यातील उत्पादित होणारी साखर आपणास चांगल्या प्रतीची वाटत नाही का ? असा खडा सवाल संचालक केदार यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्याच्या अर्थकारणाचा गाडा नेहमीच आपल्या खांद्यावर घेणाऱ्या श्री संत दामाजी साखर कारखान्याचे गतवैभव अखंडपणे जतन करण्यासाठी असे निर्णय कोणत्याही संचालक मंडळाला महागात पडतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोणत्याही प्रकारचा राजकीय विरोधक म्हणून माझी भूमिका न मांडता कारखान्याचा हितचिंतक व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्व सभासदांना पहिल्या दराप्रमाणेच आणि तेवढ्याच वजनाची साखर देण्याचा सहानुभूतीपुर्वक निर्णय विद्यमान संचालक मंडळाने करावा अशी विनंतीपुर्वक मागणी संचालक अशोक केदार यांनी केली आहे.
अन्यथा सभासद बंधूंच्या तीव्र रोषाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवावी असेही संचालक अशोक केदार यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज