टीम मंगळवेढा टाईम्स।
सांगोला शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या निवडणुकीसाठी खोटे नाव सांगून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिप्पेहळ्ळी येथील महिलेवर गुन्हा दाखल केला.
याबाबत मतदान केंद्राध्यक्ष मंगेश मनोहर शिंदे (रा. माशाळेनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी वंदना शंकरराव जाधव महिलेविरुद्ध फिर्याद दिली आहे.
या सांगोला शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणी संचालक मंडळाच्या १९ जागेच्या निवडणुकीसाठी रविवारी ६५ टक्के मतदान झाले आहे.
सांगोला पुजारीवाडी झेडपी शाळेच्या ५ बुथवर २३९० पैकी १६४० महिला सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. दिवसभर मतदान केंद्रावर महिला सभासदांनी मतदानासाठी गर्दी केली होती. दरम्यान बोगस मतदान करण्यावरून सत्ताधारी शेकाप व विरोधी गटात वादावादी झाल्याने प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत गेले.
मतदान केंद्राच्या ठिकाणी स्व. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख डॉक्टर बंधूच्या दोन भगिनी शेकाप पदाधिकारी कार्यकर्ते दिवसभर ठाण मांडून होते,
तर विरोधी गटाकडून शेतकरी सूतगिरणीचे संचालक सागर लवटे, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, अभिजित नलवडे, समीर पाटील, गुंडा खटकाळे आदी कार्यकर्ते थांबून होते.
यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर मतदानाचा ताण असल्याचे दिसून आले. दरम्यान १९ जागांसाठी सत्ताधारी शेकापचे १९ उमेदवार तर विरोधी गटाचे १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. सोमवार, ८ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर निकाल लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज