टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर मामा भोसले याच्यासह त्याच्या दोन अन्य सहकाऱ्यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत त्यांनी फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा आणि उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओकांर शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. बारामतीमधील शशिकांत सुभाष खरात या 23 वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली आहे.
20 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.
विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या आणि फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली.
पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. दरम्यान मनोहर भोसले विरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी घेतली आहे.
फसवणूक झालेल्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अटक करण्याची तजबीज सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलेय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज